मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विटरवर एक पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे. येत्या रविवारपासून मोदी सोशल मीडियाच सोडणार असल्याचे यामध्ये म्हटले आहे. यावरून दोन वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी मोदींवर आणि भाजपावर टीका करणारी पोस्ट चर्चेत आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी मोठी घोषणा करणार आहेत. याची कल्पना त्यांनी नुकतीच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर दिली आहे. कदाचित ते आभासी जगातून कायमचा संन्यास घेण्याच्या विचारात असल्याचे ट्विटवरून दिसत आहे. याचे संकेत त्यांनी दिलेले असले तरीही काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोशल मीडिया सोडू नका, द्वेष सोडा असा खोचक टोला लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या ट्विटवरून सोशल मीडियामध्ये भूकंप आला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याचे भाकित दोन वर्षांपूर्वीच केले होते. ज्या सोशल मीडियाच्या वापरातून मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाले, तोच सोशल मीडिया आता भाजपाला भारी पडू लागला आहे. ही पोस्ट राज यांनी 26 सप्टेंबर 2017 ला केली होती. आज ती खरी ठरताना दिसत आहे.
भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जे पेरलं तेच आता उगवलंय. खोटी माहिती पसरवण्यासाठी, लोकांची मनं कलुषित करण्यासाठी जे सोशल मीडिया नावाचं अस्त्र भाजपने वापरलं ते आता त्यांच्यावर बुमरँग झालंय. निवडणुका जिंकण्यासाठी वाट्टेल ती आश्वासनं दिली, लोकांची मनं भडकवण्यासाठी खोट्याचं खरं करून दाखवलं, आणि जे याला विरोध करत होते त्यांना 'ट्रोल्स' च्या माध्यमातून शिवीगाळ केली, त्यांचं खच्चीकरण केलं. हे सगळं करून सत्तेवर आल्यावर,नीट काम केली असतीत, दिलेली आश्वासनं पूर्ण केली असतीत तर एक वेळ लोकांनी दुर्लक्ष केलं असतं. पण आश्वासनं पूर्ण करणं सोडा, तुम्ही सत्तेच्या मग्रूरीत निवडणुकीच्या काळांत दिलेली आश्वासनं हा निवडणुका जिंकण्यासाठी केलेला 'जुमला' होता असं निर्लज्जपणे जाहीर केलंत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती.
या पोस्टमध्ये राज यांनी नोटाबंदी, पोलिसांकरवी प्रश्न विचारणाऱ्यांना नोटीसा पाठविण्याचे काम, महागाई आदी मुद्दे मांडले होते. आज ही पोस्ट व्हाय़रल होऊ लागली आहे.
राज ठाकरे यांची पोस्ट येथे पहा...