Raj Thackeray RSS: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेनं ९९ वर्ष पूर्ण केली असून, हे शंभरावं वर्ष सुरू आहे. यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरएसएसबद्दचं आतापर्यंतच्या कार्याबद्दल कौतुक केले. 'आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वर्धापनदिन. ९९ वर्ष पूर्ण करत शंभरीत या संघटनेने पदार्पण केलं. याबद्दल प्रत्येक संघ स्वयंसेवकाचं मनापासून अभिनंदन', म्हणत राज ठाकरेंनी आरएसएसबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राज ठाकरेंनी विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल पोस्ट शेअर केली आहे. "भारताला आपली मातृभूमी मानणारे सगळे हिंदू आहेत आणि या हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे उद्दिष्ट घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व याचा अभिमान समाजामध्ये व्हावा यासाठी गेली ९९ वर्ष संघाने निःसंशय मोठं काम केलं आहे", असे राज ठाकरे म्हणाले.
स्वयंसेवकांना करावा लागणार संघर्ष मला माहितीये -राज ठाकरे
"संघाचं काम मला कायमच अचंबित करतं. देशात कोणीतही नैसर्गिक आपत्ती आली तर तिथे तात्काळ धावून जाण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अग्रेसर असतो, हे मी अनेकदा पाहिलं आहे. संघातील बर्याच स्वयंसेवक व प्रचारकांशी माझा संवाद आहे. देशाच्या दुर्गम भागांमध्ये जाऊन काम करणं, तिथे भारतीयत्वाची, राष्ट्रीयत्वाची भावना रुजवणं, यांसाठी त्यांना किती संघर्ष करावा लागतो याचा तपशील मला माहित आहे", अशा शब्दात राज ठाकरेंनी आरएसएसच्या कार्याची प्रशंसा केली.
१०० वर्ष काम करणं सोपं नाही -राज ठाकरे
राज ठाकरेंनी पुढे म्हटलं आहे की, "मुळात एका विचाराला घट्ट धरून ठेवत, एखाद्या संघटनेने १०० वर्ष काम करावं हे सोपं नाही. जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना १०० वर्ष टिकली असेल आणि तरीही तिचा विस्तार सुरु असेल आणि ती कार्यशील असेल."
"ही संघटना कायम जागृत ठेवणाऱ्या सर्व संघ स्वयंसेवकांना माझ्या अतिशय मनापासून शुभेच्छा. हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व रुजवण्यासाठी धडपडणारा प्रत्येक घटक, विचार हा असाच तेवत राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना", असे राज ठाकरेंनी आरएसएसबद्दल म्हटलं आहे.