मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज ९७ वी जयंती आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील शिवसेना भवन रोषणाईने सजले असून राज्यभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, यानिमित्त शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. बाळासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये चढाओढ सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे, बाळासाहेब ठाकरे यांना सोशल मीडियावरुन देशभरातील अनेक नेत्यांनीही अभिवादन केले आहे. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक ह्रदयस्पर्शी व्हिडिओ मनसेकडून ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये त्यांनी शिवसेना सोडतानाचा त्यांचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा संवाद सांगितला आहे. गेल्यावर्षी २३ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबईमध्ये रविंद्र नाट्यमंदिरात मनसेचा मेळावा पार पडला होता. यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्या आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना सोडण्यावेळेचा संवाद आपल्या भाषणात सांगितला होता. हाच खास व्हिडिओ मनसेने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आपल्या ट्विटर हॅंडलवरुन पोस्ट केला आहे.
या व्हिडिओला "जा लढ, मी आहे... काही मूक संवादांमध्ये प्रचंड अर्थ दडलेले असतात... राजसाहेबांचा वंदनीय बाळासाहेबांशी अखेरचा 'राज'कीय संवाद !" अशी कॅप्शनही दिली आहे. या व्हिडिओमध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यावर बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते, ते सांगितले आहे. यामध्ये "मला आजही ती गोष्ट आठवते की जेव्हा बाळासाहेबांना कळले, हा काही राहत नाही पक्षात आता. माझी शेवटची भेट होती. मी आजपर्यंत कधी बोललो नाही तुमच्याशी ही गोष्ट. निघताना माझ्यासोबत मनोहर जोशी होते. मनोहर जोशी बाहेर गेलेले रुमच्या. रुमच्या बाहेर गेल्यावर माननीय बाळासाहेबांनी मला बोलावले. असे हात पसरले माझ्यासमोर (दोन्ही हात पसरवून दाखवत). मला मिठी मारली. आणि म्हणाले आता जा… त्यांना समजलं होतं."
दरम्यान, बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरणही करण्यात येणार आहे. या तैलचित्राच्या कार्यक्रमासाठी ठाकरे कुटुंबातील सगळ्यांनाच निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, निमंत्रण मिळाल्यानंतरही ठाकरे कुटुंब कार्यक्रमाला येणार का? याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. तसेच राज ठाकरे यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. दुसरीकडे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना विनम्रतेने अभिवादन केले.