मुंबई : पराभूत झालेल्या भाजप उमेदवाराच्या हल्ल्यात जखमी झालेले मनसेचे विजयी उमेदवार संजय तुर्डे यांची शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यानुसार या प्रकरणात सहभागी असलेल्या अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी अटक करण्यात आलेले भाजप उमेदवार सुधीर खातू यांच्यासह सातही जणांना न्यायालयाने २७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.मुंबईत निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर संतप्त झालेल्या भाजपचे पराभूत उमेदवार सुधीर खातू यांच्यासह त्यांच्या कार्यकत्यांनी मनसेचे निवडून आलेले नगरसेवक संजय तुर्डे यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. यावेळी जवळपास १५० ते २०० हल्लेखोर कार्यकत्यांचा समावेश होता. त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या मनसे कार्यकर्त्यांवरही लाठी, हॉकी स्टिक, तलवारीने हल्ला चढविला. तुर्डेंसह जखमींवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शनिवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तुर्डे आणि जखमी कार्यकर्त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. मनसे कार्यकत्यांनी रुग्णालयात गर्दी केली होती. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनीही फौजफाटा वाढविला. यावेळी माध्यमांशी बोलणे मात्र राज ठाकरे यांनी टाळले. याप्रकरणातील घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागली असल्याची माहिती समोर येत आहे. त्या फुटेजच्या आधारे पोलीस याप्रकरणातील अन्य आरोपींचा शोध घेत आहे. तुर्डे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी खातूसह सात जणांना अटक केली. न्यायालयाने सातही जणांना २७ तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. पसार आरोपींचा शोध सुरु असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भारत भोईटे यांनी दिली. (प्रतिनिधी)
राज ठाकरेंनी घेतली तुर्डेंची भेट
By admin | Published: February 25, 2017 11:06 PM