मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. या कारवाईमुळे मनसैनिकांत असंतोष आहे. या यंत्रणांना मी योग्य ती उत्तरे देईनच, कार्यकर्त्यांनी टोकाचे पाऊल उचले नये, असे आवाहन राज यांनी केले आहे. परंतु, मनसे सैनिकांकडून भाजप बदल्याचं राजकारण करत असल्याचे आरोप करत, टीका करण्यात आली आहे.
देशात आणि राज्यात हिटलरशाही सुरू असल्याचा आरोप अप्रत्यक्षरित्या मनसेकडून करण्यात आला आहे. तसेच 'ईडियट हिटलर' असा खोचक टोला भाजपला लगावण्यात आला आहे. राज ठाकरे यांची ईडीकडून सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मनसे पदाधिकाऱ्यांची अटक करण्यात येत आहे. त्यात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांचाही समावेश आहे.
संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी संदीप देशपांडे यांनी 'ईडीयट हिटलर' असं नाव असलेले टी-शर्ट परिधान केले होते. त्यांच्या या टी-शर्टची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ईडीयट हिटरल अशी टीका भाजपवर करण्यासाठीच हे टी-शर्ट परिधान केल्याचे बोलले जात आहे.
ईडीने राज यांना चौकशीस हजर राहण्यास बजावल्यानंतर विरोधी पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठाणे येथे एका मनसे कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याचा दावा केला गेला, तर ‘राजगड’ या पक्ष कार्यालयाबाहेरही आत्महत्येचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी मात्र तसे घडले नसल्याचे स्पष्ट केले.