पुणे : आगामी लोकसबा निवडणुकीत मोदी- शहा आणि अर्थातच भाजपा शिवसेना प्रणित महायुतीविरोधात दंड थोपटलेले राज ठाकरेंची तोफ येत्या १८ एप्रिलला धडाडणार आहे. सिंहगड रस्त्यावरील गोेयल गंगा मैदानावर सायंकाळी ५ वाजता ही सभा होणार आहे. पुण्यातील काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीसह मनसे कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज यांनी पुण्यात सभा घ्यावी अशी इच्छा व्यक्त केली होती. पुण्यात काँग्रेसचे मोहन जोशी व बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, मावळमधून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार व शिरुरमधून डॉ. अमोल कोल्हे लोकसभेच्या रिंगणात आहे्. त्यामुळे या सर्व लढतींच्या दृष्टीने राज ठाकरे यांची पुण्यातील सभा निर्णायक भूमिका बजावू शकते असा अंदाज आघाडीसह मनसे कार्यकर्त्यांचा आहे. राज ठाकरे व शरद पवार यांची अलिकडच्या काळातील जवळीक पाहता राज ठाकरे पुण्यात सभा घेतील असा अंदाज राजकीय वर्तुळातून वर्तविला जात होता. बुधवारी तो खरा ठरला. राज ठाकरे यांनी मोदी शहा यांच्या भाजपा सरकारविरोधात दंड थोपाटले असून राज्यात मुंबई, उस्मानाबाद., नाशिक , ठाणे, औरंगाबाद अशा विविध ठिकाणी १० - १२ सभा गेण्याचे जाहीर केले होते. आता त्यात पुण्याची भर पडली आहे. राज यांनी मागील काही सभांमध्ये मोदी शहा यांच्याविरुद्ध चांगलेच आक्रमक होत राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. तसेच आपल्या टीकेची धार तीव्र करत ते पुण्यात काय बोलतील याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. ठाकरे यांनी मनसे लोकसभा निवडणुक लढविणार नसल्याचे जाहीर करतानाच मतदारांना कोणालाही फायदा होवू द्या. पण भाजपा प्रणित महायुतीला मतदान करु नका असे आवाहन प्रत्येक सभेत केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या ठिकाणी मनसेवर तोंडसुख घेताना मनसे आता उनसे म्हणजेच उमेदवार नसलेली सेना झाली असल्याची कडवट टीका केली होती. त्यांच्या टीकेला राज ठाकरे पुण्यात कसे प्रत्युत्तर देता हेही पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पुण्यातही मोदी - शहांविरुद्ध ‘राज’ यांची तोफ धडाडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 5:33 PM
राज ठाकरे व शरद पवार यांची अलिकडच्या काळातील जवळीक पाहता राज ठाकरे पुण्यात सभा घेतील असा अंदाज राजकीय वर्तुळातून वर्तविला जात होता.
ठळक मुद्देयेत्या १८ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता ही सभा होणार