राजेश जोशीला अटक : ३३ जणांकडून २ कोटी लुबाडले नागपूर : आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांची फसवणूक करणारा रविराज इन्व्हेस्टमेंट व स्ट्रॅटेजिस कंपनीचा प्रमुख राजेश सुरेश जोशी (४४) याला बुधवारी मध्यरात्री आर्थिक गुन्हेशाखेने अटक केली. त्याला गुरुवारी एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. पी. मुळे यांच्या न्यायालयात हजर करून त्याचा १६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला. जोशी हा कुटुंबासह जूनपासून बेपत्ता होता. राजेशने विवेकानंदनगर येथील आपल्य कौस्तुभ बंगल्यात जानेवारी २०१० मध्ये रविराज इन्व्हेस्टमेंट व स्ट्रॅटेजिस कंपनी या नावाने आपला गोरखधंदा सुरू केला होता. या अंतर्गत त्याने रविराज मायनिंग, रविराज अॅग्रो, रविराज वेल्थ मॅनेजमेंट, रविराज इन्फ्राकॉन आणि रविराज सेंटर फॉर सोशल रिकन्स्ट्रक्शन या नावाने वेगवेगळ्या कंपन्या सुरू केल्या होत्या. अशा होत्या योजना गुंतवणूकदारांना भुरळ पाडून लुबाडण्याच्या जोशीच्या तीन योजना होत्या. एक लाख रुपये गुंतवल्यास त्यावर महिन्याला तीन टक्के दराने तीन हजार रुपये व्याज, ही पहिली योजना होती. एक लाख रुपये गुंतवल्यास मासिक व्याज न देता तीन महिन्याचे व्याज घेतले तर १० टक्के दराने त्रेमासिक १० हजार रुपये व्याज , ही त्याची दुसरी योजना होती. तिसरी योजना ‘फिक्स डिपॉझिट’ची होती. या योजनेत गुंतवणूक केल्यास अडीच वर्षात मूळ रक्कम दुप्पट, अशी ही योजना होती. विवेकानंदनगर येथेच राहणाऱ्या विजय वामन मराठे यांनी २९ फेब्रुवारी २०१२ रोजी पहिल्या योजनेत २ लाख रुपये गुंतवले होते. त्यांना जोशी याने वचन चिठ्ठी लिहून दिली होती. त्यानुसार त्यांना २९ आॅक्टोबर २०१४ रोजी गुंतवणुकीची मूळ रक्कम परत केली जाईल, असे त्यात नमूद करण्यात आले. मराठे यांना नोव्हेंबर २०१३ पर्यंत नियमित मासिक ६ हजार रुपये व्याज मिळत गेले. त्यानंतर व्याज देणे बंद करण्यात आले. मराठे हे डिसेंबर २०१३ मध्ये जोशीच्या कार्यालयात गेले असता डेअरी प्रकल्पाला कर्ज देणे सुरू असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर जूनपासून जोशी हा कार्यालयाला कुलूप लावून आपल्या कुटुंबासह बेपत्ता झाला होता. मराठे यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलीस ठाण्यात ८ जुलै २०१४ रोजी ठगबाज राजेश जोशी, कंपनीचे इतर नातेवाईक संचालक आणि एजंट यांच्याविरुद्ध भादंविच्या ४२०, ४०६, १२० ब आणि महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायदा १९९९च्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण तपासासाठी आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. आतापर्यंत ३३ गुंतवणूकदारांनी या कंपनीविरुद्ध तक्रारी नोंदवल्या असून फसवणुकीची रक्कम १ कोटी ९२ लाख ४० हजार एवढी आहे. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक एन. पी. पवार यांनी जोशीला न्यायालयात हजर केले. विशेष सरकारी वकील विश्वास देशमुख यांनी या आरोपीचा १४ दिवसांच्या पोलीस कोठडी रिमांडची मागणी केली. आरोपीचे वकील अॅड. डी. एस. श्रीमाळी आणि अॅड. राम मासुरके यांनी पोलीस कोठडीस विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपीला १६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)नातेवाईकांनाच केले संचालकराजेश जोशी याने आपल्या कंपनीत पत्नी राधा जोशी, वडील सुरेश जोशी, आई सरिता जोशी आणि काका शरद जोशी यांना संचालक केलेले आहे. तो अमोल महाजन, भरत हुद्दार, नैना हुद्दार आणि पंकज चौधरकर या एजंटमार्फत गुंतवणूकदारांना आपल्या जाळ्यात ओढून लुबाडणुकीचा धंदा करीत होता. जोशीने शंकरनगर शाखेच्या महाराष्ट्र बँकेतील खात्यातून मोठे व्यवहार केलेले आहेत. तेथून तो मोठ्या रकमा अन्यत्र वळत्या करीत होता. एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेतही त्याचे खाते असल्याची पोलिसांची माहिती आहे.
रविराजचे ‘राज’ उघडले
By admin | Published: August 08, 2014 1:13 AM