रत्नागिरी : राजापूरचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना शनिवारी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात तत्काळ प्राथमिक उपचार मिळाल्यामुळे त्यांची प्रकृती स्थिर आहे. अधिक तपासण्यांसाठी त्यांना कोल्हापूरला हलविण्यात आले आहे.आमदार साळवी यांना सकाळपासूनच काहीसे अस्वस्थ वाटत होते. हाताला सारख्या मुंग्या येत होत्या. त्यामुळे सकाळी आठ वाजण्यापूर्वीच ते एका खासगी रुग्णालयात गेले. तेथील डॉक्टरनी त्यांचा ईसीजी काढला. मात्र, तो निर्दोष असल्याचे सांगितले. त्यामुळे साळवी यांनी नियमित दिनक्रम सुरू केला. शनिवारी खासदार विनायक राऊत रत्नागिरीमध्ये होते. त्यामुळे आमदार साळवी विश्रामगृहात गेले. खासदार राऊत यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता समितीची बैठक होती. तेथेही साळवी उपस्थित होते.दुपारी दोनच्या सुमारास त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागला. त्यांना डॉ. संजय लोटलीकर यांच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तत्काळ उपचार मिळाल्याने काही वेळातच त्यांची प्रकृती स्थिर झाली. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूरला हलविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
राजन साळवी रुग्णालयात
By admin | Published: August 14, 2016 1:33 AM