मुंबई : काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील आणि भाजपचे संजय उपाध्याय यांनी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज भरले. ही निवडणूक ४ ऑक्टोबरला होणार आहे. पाटील यांनी विधान भवनात अर्ज भरला तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोेले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खा. सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते.संजय उपाध्याय यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. मंगल प्रभात लोढा, माजी मंत्री गणेश नाईक, विद्या ठाकूर आदी उपस्थित होते.
विजयाचे दावे-प्रतिदावे महाविकास आघाडीकडे निर्भेळ बहुमत आहे आणि रजनी पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप व मित्रपक्षांचे बळ ११९ असून आणखी २०-२५ आमदार आमच्याकडे येऊ शकतात, असा दावा केला.