मुंबई : ज्येष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात गँगस्टर छोटा राजन याला आवाजाचे नमुने देण्याचा आदेश द्यावा, असा अर्ज सीबीआयने शुक्रवारी विशेष मोक्का न्यायालयात केला. न्यायालयाने याबाबत छोटा राजनला ११ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचा निर्देश दिला आहे.जे. डे यांच्या हत्येप्रकरणी छोटा राजन याला मुख्य आरोपी करण्यात आले आहे. याप्रकरणी छोटा राजनच्या आवाजाचे नमुने सीबीआयला घ्यायचे आहेत. सुरुवातील छोटा राजनने आवजाचे नमुने घेण्यास परवानगी दिली. मात्र प्रत्यक्षात सीबीआय अधिकारी आवाजाचे नमुने घेण्यासाठी गेले तेव्हा छोटा राजनने वकिलाचे मत घेतल्याशिवाय आवाजाचे नमुने देणार नाही, असे अधिकाऱ्याला सांगितले. शुक्रवारच्या सुनावणी वेळी सीबीआयने छोटा राजनला आवाजाचे नमुने देण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारा अर्ज विशेष मोक्का न्यायालयात सादर केला. तसेच या हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यासाठी आणखी एक महिना लागेल, अशी माहितीही सीबीआयचे वकील अविनाश रसाळ यांनी न्या. एस.एस. आडकर यांना दिली. त्यावर न्या. आडकर यांनी दिल्लीवरून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुंबई न्यायालयात हजर करण्यात आलेल्या छोटा राजनला आवाजाच्या नमुन्याबाबत ११ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले. दरम्यान, डे हत्याप्रकरणी क्राइम ब्रँचने आरोपपत्र दाखल करताना न्यायालयात डे यांचा जमा केलेला लॅपटॉप, दोन मोबाइल आणि राजनच्या संभाषणाची सीडी देण्याची विनंतीही सीबीआयने न्यायालयाला केली. छोटा राजनच्या सांगण्यावरून ११ जून २०११ रोजी डे यांची त्यांच्या राहत्या घराजवळ गोळी झाडून हत्या करण्यात आली. (प्रतिनिधी)
सीबीआयला हवा छोटा राजनचा आवाज
By admin | Published: February 06, 2016 3:37 AM