'राजस्थान, छत्तीसगडला ४५० रुपयांना सिलिंडर, मग महाराष्ट्राच्या जनतेने काय पाप केलंय?', काँग्रेसचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 04:33 PM2023-11-24T16:33:01+5:302023-11-24T16:33:47+5:30
Nana Patole News :
मुंबई - देशातील पाच राज्यांमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीमध्ये मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी राजकीय पक्षांकडून विविध आश्वासनं दिली जात आहेत. दरम्यान, भाजपानेही सत्तेत आल्यास राजस्थान आणि छत्तीसगडमधील जनतेला ४५० रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देण्याच आश्वासन दिलं आहे. या आश्वासनावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षनाना पटोले यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. राजस्थान, छत्तीसगडमध्ये ४५० रुपयांना सिलिंडर देण्याचं आश्वासन भाजपा नेते देताहेत, मग महाराष्ट्रात भाजपाचं सरकार असताना तिथे या घोषणेची अंमलबजावणी का करत नाहीत, असा सवाल नाना पटोले यांनी विचारला आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, राजस्थान व छत्तीसगडमध्ये भाजपाचे सरकार आल्यास ४५० रुपयांना गॅस सिलिंडर देणार अशी मोठी जाहिरातबाजी भारतीय जनता पक्षाने केली आहे. भाजपाचे मोठे नेतेही ४५० रुपयांमध्ये सिलिंडर देण्याची भाषा करत आहेत. महाराष्ट्रात सध्या भाजपाचेच सरकार आहे मग भाजपा सरकार महाराष्ट्रात ४५० रुपयांना सिलिंडर देत का नाही? महाराष्ट्रातील जनतेने काय पाप केले आहे का? ही सर्व बनवाबनवी आहे, उज्ज्वला गॅस योजनेत केवळ २० टक्के सिलिंडर रिफील केली जातात ही योजना फेल गेली आहे पण उज्वला योजनेच्या नावाखाली गरिबांना मिळणारे केरोसिन मात्र भाजपा सरकारने बंद केले आहे. नफा कमावणे हे सरकारचे काम नाही पण २०१४ पासून सरकार नफा कमावण्याचे काम करत आहे, जनतेची लूट करुन नफा कमावणे हे भयावह आहे.
एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही पनवती म्हटलेले नाही. ते देशाचे आदरणीय पंतप्रधान आहेत. सोशल मीडियावर पनवती हा शब्द मागील दोन तीन दिवसांपासून ट्रेंड होत आहे, पनवती म्हणजे अहंकार व हा अहंकार म्हणजे पनवती गेली पाहिजे अशी सर्वांची भूमिका आहे, तोच संदर्भ ट्विटमध्ये आहे. भाजपा ते स्वतःवर घेत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, असा टोलाही पटोले यांनी लगावला.