लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नागपाड्यात भररस्त्यात व्यापाऱ्याकडील ३० लाख रुपये लुटल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या लुटीमागे राजस्थानची टोळी असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील टिपरला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत, तर राजस्थानला पळून गेलेल्या चौकडीचा शोध सुरू आहे.मुंबई सेंट्रल परिसरात व्यापारी विक्रम पुरोहित (२४) हे कुटुंबीयांसोबत राहतात. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास विक्रम हे त्यांच्या सहकाऱ्यासोबत दुचाकीवरून घराकडे येत होते. त्याच दरम्यान वाटेत चार तरुणांनी त्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून, त्यांच्याकडील ३० लाख रुपये असलेली बॅग हिसकावली. पुरोहित यांना मारहाण करून त्यांचे पैसे आणि दुचाकीसह पळ काढला. नागपाडा पोलिसांनी या प्रकरणी जबरी चोरी, दुखापतीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या प्रकरणात गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे. त्यानेच पुरोहितकडील पैशांबाबत माहिती दिली असून, तो मुख्य सूत्रधार असल्याचे समजते. त्याच्या चौकशीत अन्य चार जण राजस्थानला पळून गेल्याचे समोर आले आहे. याच आरोपींचा गिरगावातील ३० लाखांच्या लुटीत सहभाग असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नागपाड्यातील ३० लाखांच्या लुटीमागे राजस्थानची टोळी
By admin | Published: July 13, 2017 5:32 AM