कात्रजचा घाट; काँग्रेसला हूल देऊन राजेंद्र गावित भाजपाच्या गोटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 05:00 PM2018-05-08T17:00:31+5:302018-05-08T17:13:37+5:30
भाजपाने आपल्या व्यवस्थापन कौशल्याने गावित यांना आपला शब्द फिरवायला भाग पाडले.
मुंबई: राज्यातील आगामी विधानपरिषद आणि पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांना कात्रजचा घाट दाखवला. कालच रमेश कराड यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावून भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा भाजपाने 'राजकीय व्यवस्थापन कौशल्याचा' उत्कृष्ट नमुना पेश करत काँग्रेसला धक्का दिला. आज (मंगळवार) सकाळपासून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असे सांगणारे माजी मंत्री राजेंद्र गावित यांनी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाची ही राजकीय खेळी काँग्रेसबरोबरच शिवसेनेला काटशह देणारी मानली जात आहे.
तत्पूर्वी आज सकाळपासूनच पालघर पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार राजेंद्र गावित भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र या चर्चेत तथ्य नसल्याचं गावित यांनी स्पष्ट केलं. मी काँग्रेसचा कार्यकर्ता असून काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, भाजपाने आपल्या व्यवस्थापन कौशल्याने गावित यांना आपला शब्द फिरवायला भाग पाडले. राजेंद्र गावित यांच्या अधिकृत पक्ष प्रवेशानंतर आता पालघर पोटनिवडणुकीसाठीच्या उमेदवारीसाठी त्यांचे नाव पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आले आहे. आज रात्रीपर्यंत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानं रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात २८ मे रोजी पोटनिवडणूक होत आहे. वनगा यांच्या कुटुंबानं गेल्याच आठवड्यात शिवसेनेत प्रवेश केला. चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास यांना शिवसेनेनं उमेदवारी दिल्यानं भाजपासमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळेच भाजपाकडून गावित यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू होती. गावित यांना भाजपा प्रवेश देऊन त्यांना निवडणुकीचं तिकीट द्यायचं, अशी भाजपाची रणनिती असल्याची चर्चा होती. त्यामुळेच गावित यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलं. मी काँग्रेसचा कार्यकर्ता असून पक्षातच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आपण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी सांगितले.