रत्नागिरी : मच्छिमारी नौकेवरून आलेल्या एका खलाशाने काहीजणांनी धमकावल्याच्या भीतीने मुसाकाझी बंदरातील समुद्रात उडी टाकली. त्यानंतर तब्बल १७ तास समुद्रातून पोहून येत आज शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता भगवती बंदर गाठले. अखेर स्थानिक बोटीवरील एका खलाशाने त्याला बोटीत घेतले व तटरक्षक दलाच्या स्वाधीन केले. राजेश उदेक करबट (३२, पालघर) असे त्याचे नाव असून, उपचारानंतर त्याला त्याच्या घरी पालघरला पाठविण्यात आले आहे. आज सायंकाळी भगवती बंदरातील समुद्रात कोणीतरी पोहत असल्याचे लक्षात आल्यावर संदेश करंजावकर (गावडेआंबेरे) याने त्याला आपल्या नौकेत घेतले. त्यानंतर राजेशची थरारक, भयावह कथा समोर आली. राजेशने दिलेल्या माहितीनुसार ज्या नौकेवरून तो मच्छिमारीसाठी आला होता, त्यातील काहींनी रात्री त्याला वेडा, पागल असल्याचे सांगत त्याच्याशी भांडण केले. त्याला पाण्यात ढकलून देण्याची धमकीही दिली. त्यामुळे घाबरून आपण रात्री १ वाजण्याच्या सुमारास समुद्राच्या पाण्यात उडी घेतली. तेथून पोहत-पोहत कसेबसे भगवती बंदर गाठल्याचे त्याने सांगितले. तटरक्षक दलाच्या जवानांनी त्याला धीर देत नंतर त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले व त्याला त्याच्या घरी पाठविण्यात आले. (प्रतिनिधी)
सागरी लाटांशी १७ तास झुंज देत राजेशने गाठले बंदर
By admin | Published: January 16, 2015 11:21 PM