मुंबई - कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी होती. मात्र काही ठिकाणी कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे यंत्रेणेवर मोठा ताण आला होता. त्यामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी 17 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात साडे आठ हजार पदांची भरती प्रकिया सुरू होत असल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागात मेगाभरती करण्यात येणार असून 8500 जागांसाठी आता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही जाहिरात रिक्त असलेल्या एकूण 17 हजार पदांपैकी 50 टक्के पदांसाठी असणार आहे. आरोग्य विभागाच्या संकेत स्थळावर याबाबतची अधिक माहिती देण्यात आली आहे. या जाहिरातीमुळे दीर्घकाळ प्रतिक्षेत असलेल्या अनेकांना दिलासा मिळाला आहे. याआधी फेब्रुवारी 2019 साली या जाहिरातीसाठी महापोर्टलवरुन अर्ज मागवण्यात आले होते. त्यावेळी पात्र ठरलेले उमेदवार आता नव्या भरतीसाठीही प्रक्रियेत पात्र ठरणार आहेत.
राज्य सरकारने जाहिरात प्रसिद्ध करुन अनेक विद्यार्थ्यांना दिलासा दिल्याचं म्हटलं जात आहे. जाहिरातीसाठी पुढच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येतील अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 28 फेब्रुवारी 2021रोजी एकाच दिवशी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. फेब्रुवारी 2019 साली जे उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरले होते ते उमेदवार आता या नव्या जाहिरातीसाठीही पात्र ठरतील. या परीक्षेसाठी फेब्रुवारी 2019 मध्ये महापोर्टलच्या माध्यमातून अर्ज मागवले होते. त्यामुळे आता जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्या उमेदवारांना पुन्हा नव्याने अर्ज करायची गरज नसल्याचं सांगण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीला चालना मिळण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली होती. पुढील काही महिन्यात साधारण आठ हजार पेक्षा जास्त नोकर भरती आरोग्य आणि ग्रामविकास विभागात केली जाणार आहे. कोरोना संकटामुळे आरोग्य क्षेत्रात आवश्यक भरती केली जाणार आहे. पुढील दोन महिन्यात नोकरभरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचंही राजेश टोपेंनी सांगितलं होतं.