मुंबई-
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील निर्बंधांची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी ओमायक्रॉनच्या धोक्याबाबतही सतर्क राहण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येसोबतच ओमायक्रॉनच्या धोक्यामुळेच सरकारनं खबरदारी म्हणून काही निर्बंध लागू केले आहेत. त्याचं नागरिकांना पालन करावं असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं. यावेळी त्यांनी ओमायक्रॉन व्हेरिअंटचा धोका किती गंभीर आहे याचीही माहिती दिली.
राज्यात निर्बंध लागू केले असले तरी त्याचा कोणताही चुकीचा अर्थ कुणी काढू नये. मुख्यत: सध्या लग्नसराई सुरू झाली आहे, ख्रिसमस आणि नववर्ष स्वागताचा काळ आहे यात लोकांची गर्दी होऊ नये त्यामुळेच निर्बंध लागू केले आहेत. तसंच ओमायक्रॉनची रुग्णसंख्या वाढत असल्यानं त्याकडेही लक्ष देणं गरजेचं झालं आहे.
राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला या निर्बंधांमागचं प्रमुख कारण म्हणजे जगात जर आपण पाहिलं तर युरोप, अमेरिका आणि फ्रान्समध्ये ओमायक्रॉनच्या संसर्गाची गती एका दिवसात दुप्पट होऊ शकते इतकी आहे हे दिसून आलं आहे. गती आहे पण त्याबाबत भीती बाळगण्याची गरज नाही. कारण मृत्यूदर अधिक नाहीय. असं असलं तरी काळजी घेणं गरजेचं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की नववर्षाचं स्वागत नक्की सर्वांनी करावं, पण नियम पाळून वागावं, असंही राजेश टोपे म्हणाले.
लाट आली तर ती ओमायक्रॉनचीच असेलओमायक्रॉनच्या संसर्गाची गती जर दुप्पट आहे. तर याचा अर्थ लक्षात घ्या की आपल्याकडे सध्या जो ६०० ते ७०० चा आकडा होता तो आता १४०० पर्यंत वाढत आहे. त्यात ओमायक्रॉनचे राज्यातील रुग्णही १०० च्या घरात गेले आहेत. संसर्गाची गती वाढत गेली तर आता तिसरी लाट आलीच तर ती ओमायक्रॉनचीच असेल अशी शक्यता आहे, असं राजेश टोपे म्हणाले.
ऑक्सिजनच्या अनुशंगानं लॉकडाऊन करणारज्यादिवशी राज्याला ८०० मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्यादिवशी आपल्याला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असं राजेश टोपे म्हणाले. पण कोरोना संसर्गाची गती तर अधिक असेल तर ऑक्सिजनची ८०० मॅट्र्रीक टनाची आवश्यकता ५०० मॅट्रीक टनांवर आणावी लागेल, असंही टोपे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.