मुंबई: महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर 34 व्या दिवशी पार पडला. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण 36 नव्या मंत्र्यांचा समावेश आहे. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीकडून घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील आमदार राजेश टोपे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे.
पाचव्यांदा निवडून आलेले राजेश टोपेंचं नाव स्त्तास्थापेनच्या पहिल्या दिवसापासून आघाडीवर होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक बडे नेते हे भाजप आणि शिवसेनेत जात असताना राजेश टोपे यांनी राष्ट्रवादीवर निष्ठा कायम ठेवली. त्यामुळे त्यांना मिळाले कॅबिनेट मंत्रिपद हे त्यांच्या एकनिष्ठचं फळ असल्याची चर्चा जालना जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
कोण आहेत राजेश टोपे
राजेश टोपे हे जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदार संघाचे नेतृत्व करतात. या आधी त्यांनी 2004 ला अंबड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत विजय मिळवला होता. त्यांनतर अंबड विधानसभा मतदारसंघ बदनापूरमध्ये विलीन झाला. त्याचवेळी घनसावंगी विधानसभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे टोपे यांनी 2009 ला घनसावंगीमधून निवडणूक लढवत विजय मिळवला. त्यांनतर त्यांना आघाडीसरकारामध्ये मंत्रीपद सुद्धा देण्यात आले होते. तर 2014 मध्ये मोदी लाटेत सुद्धा टोपे यांनी तिसऱ्यांदा विजयाची मालिका कायम ठेवली होती. तर आता 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते इतर पक्षात जात असताना ते राष्ट्रवादीसोबतच राहिले. त्यामुळे त्यांच्या एकनिष्ठचं फळ त्यांना आज पक्षाकडून मिळाले असल्याचे बोलले जात आहे.