प्राची सोनवणे,
नवी मुंबई- गेल्या काही महिन्यांपासून सीबीडीतील राजीव गांधी क्रीडा संकुलाच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे. मार्चअखेरीस या क्रीडा संकुलाचे काम पूर्ण केले जाणार असून त्यानंतर महापालिका क्षेत्रातील खेळाडूंना त्याचा वापर करता येणार आहे. या मैदानाची लांबी ३ मी.ने वाढविण्यात आली असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे लेव्हलिंग याठिकाणी करण्यात येत आहे. या सर्व कामासाठी १ कोटी ८० लाख रुपये खर्च केला जाणार आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी या ठिकाणी भूमिगत अशी अत्याधुनिक यंत्रणा बसविली जाणार आहे. यामध्ये भूमिगत पाण्याची साठवणूक करून निचरा केला जाणार आहे. पाण्याची बचत करण्यासाठी तसेच मैदान परिसरातील रोपट्यांकरिता स्प्रींकलर सिस्टीमचा वापर केला जाणार असल्याची माहिती क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव यांनी दिली. तीन ते सहा वयोगटातील बालकांकरिता मैदानाच्या उजव्या बाजूला स्पोटर््स नर्सरी उभारण्यात येणार आहे. याठिकाणी सहा वर्षांखालील मुलांना खेळाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मैदानाच्या डाव्या बाजूला असलेल्या जागेत बहुद्देशीय खेळ खेळण्याची संधी उपलब्ध आहे. यामध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल, बास्केटबॉल या पाच खेळांचा समावेश आहे. क्रीडा संकुलाच्या बाहेरील बाजूस असलेल्या मोकळ््या जागेत बॅडमिंटन तसेच लॉन टेनिस खेळता येणार आहे. मैदानाच्या चारही बाजूंना रोपांची लागवड करून याठिकाणी सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. शहरातील क्रीडा संस्कृती जपण्यासाठी तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता अत्याधुनिक सोयी-सुविधा पुरविल्या जाणार आहेत. मैदानातील जागेचा पुरेपूर वापर कसा करता येईल याचे सर्वेक्षण करून त्यानुसार कामाला सुरुवात झाल्याची माहिती क्रीडा विभागाने दिली आहे. क्रिकेट आणि अॅथलेटीक ट्रॅक या ठिकाणी तयार केला जाणार आहे. दोन ते तीन महिन्यांत मैदान सरावासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.>प्रशिक्षकांची भरतीखेळांडूना योग्य प्रशिक्षण मिळावे याकरिता क्रीडा परीक्षकांची भरती प्रक्रिया सुरू असल्याची माहिती क्रीडा विभागाने दिली. चार मुख्य क्रीडा मार्गदर्शक, नऊ सहाय्यक क्रीडा मार्गदर्शक आणि तीन मदतनीस यांची नव्याने भरती केली जाणार आहे. याकरिता अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्जांची संख्या कमी असल्याने शैक्षणिक अर्हता शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.>शहरातील खेळाडूंना सर्व सोयी-सुविधांयुक्त मैदान उपलब्ध व्हावे, योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळावे या दृष्टिकोनातून महापालिकेच्या वतीने सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. सर्वच वयोगटातील व्यक्तींना या क्रीडासंकुलाचा लाभ घेता येणार असून या वर्षभरात विविध स्पर्धांचे आयोजन, उन्हाळी शिबिर आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.-रेवप्पा गुरव, क्रीडा अधिकारी