मुंबई : मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेल्या तिढ्यानंतर आता शिवसेना आणि भाजपामधील संबंध आता कमालीचे बिघडले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात फोडाफाडीचे राजकरणाची चर्चा पाहायला मिळत आहे. तर या मुद्यावरून काँग्रेसचे नेते व माजी खासदार राजीव सातव यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपकडे फोडाफाडीचे कौशल्य असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तर फोडाफोडीच्या विद्यापीठाचे कुलगुरू असल्याची टीका त्यांनी केली आहे.
एका वृत्तवाहिनीला प्रतिकिया देताना सातव म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश दिला आहे. त्यामुळे विरोधात बसण्याची भूमिका विधानसभा निवडणुकीचा आलेल्या निकालच्या पहिल्या दिवसापासून आमची राहिलेली आहे. तर भाजपच्या विरोधातचं आमचे काम असणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीनेचं आमची वाटचाल असणार असल्याचे सातव म्हणाले.
तर भाजपबद्दल बोलताना ते म्हणाले की, मणिपूरमध्ये फक्त दोन आमदार असताना सुद्धा भाजपने सत्ता स्थापन केलं. भाजपला महाराष्ट्रात स्त्ता स्थापन करायची आहे. त्यामुळे त्यांनी ते करावे. तसेच भाजपकडे फोडाफाडीचे कौशल्य असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तर फोडाफोडीच्या विद्यापीठाचे कुलगुरू असल्याची टीका सुद्धा सातव यांनी यावेळी केली.
भाजप-शिवसेनामधील मुख्यमंत्रीपदावरून सुरु असलेल्या सत्तासंघर्षाचा तिढा काही सुटायला तयार नाही. त्यातच आता शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकतात असेही बोलले जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग आला असल्याचे पाहायला मिळत आहे.