- योगेश बिडवईमुंबई - राजकमल कलामंदिर म्हटल्यानंतर साहजिकच शांताराम राजाराम वणकुद्रे अर्थात व्ही. शांताराम यांची आठवण येते. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, वितरक अशा विविध भूमिकांनी भारतीय चित्रपटसृष्टीत सुवर्णाक्षरांनी नाव कोरलेल्या शांताराम बापूंनी या स्टुडिओची उभारणी केली.भारतातील सर्वाधिक अत्याधुनिक स्टुडिओत राजकमलची गणना होते. जवळपास सर्व भारतीय भाषांतील निर्मात्यांनी येथे चित्रपट निर्मिती केली आहे. गाण्याचे रेकॉर्डिंग, पटकथा लिहिण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, शूटिंग, डबिंग, एडिटिंग, मिक्सिंग आदी चित्रपट निर्मितीशी संबंधित सर्व सुविधायुक्त आशिया खंडातील हा एकमेव स्टुडिओ आहे.सत्यजित राय, राज कपूर, ऋत्विक घटक, मनमोहन देसाई, यश चोप्रा, सुभाष घई, ऋषिकेश मुखर्जी, शक्ती सामंता, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, जी. पी. सिप्पी, बी. आर. चोप्रा, मृणाल सेन आदींना येथे चित्रपटनिर्मिती करताना पूर्ण समाधान मिळाले. रिचर्ड अॅटेनबरो यांनी आॅस्कर विजेत्या गांधी सिनेमाची स्टुडिओतील दृश्ये येथेच चित्रित करण्यास प्राधान्य दिले.राजकमल प्रोडक्शनच्या ४७ सिनेमांव्यतिरिक्त देशभरातील तब्बल २ हजार चित्रपटांना राजकमल स्टुडिओने तांत्रिक साहाय्य केले. या स्टुडिओत शकुंतला (हिंदी, १९४३) हा पहिला चित्रपट तयार झाला. शांताराम बापूंनी राजकमल स्टुडिओत निर्मिती केलेल्या परबत पें अपना डेरा (हिंदी, १९४५), डॉ. कोटणीस की अमर कहानी (हिंदी व इंग्रजी, १९४६), अपना देश (हिंदी व तेलगू, १९४९) दहेज (हिंदी, १९५०), अमर भुपाळी (मराठी, १९५१), तीन बत्ती चार रास्ता (हिंदी, १९५३), सुबहा का तारा (हिंदी, १९५३) या चित्रपटांनी भारतीय सिनेमाला नवी ओळख मिळवून दिली.चित्रपट निर्मितीच्या ६६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात व्ही. शांताराम यांनी भारतीय सिनेमाला ध्वनी व रंगांची नवी ओळख मिळवून दिली. झनक झनक पायल बाजे (१९५५) हा पहिला रंगीत सिनेमा म्हणजे भारतीय शास्त्रीय नृत्य आणि संगीतासाठी ओळखला जातो.राजकमल स्टुडिओतच निर्मिती केलेला दो आँखे बारह हाथ (१९५७) हा सामाजिक आशयाचा सिनेमा सर्व देशाने डोक्यावर घेतला.मराठी माणसाचा एकमेव स्टुडिओराजकमल कलामंदिर हा मराठी माणसाचा एकमेव स्टुडिओ आहे. लहानपणी सुटीच्या दिवशी किंवा आई जयश्री यांचे शूटिंग असेल तर आम्ही त्यांच्यासोबत यायचो, अशी आठवण किरण शांताराम यांनी सांगितली.स्टुडिओला आई-वडिलांचे नावव्ही. शांताराम यांनी त्यांचे वडील राजाराम व आई कमल यांच्या नावावरून स्टुडिओला राजकमल हे नाव दिले.चित्रपटसृष्टीलामिळाले नवे तारेव्ही. शांताराम आणि राजकमल स्टुडिओने दुर्गा खोटे, उल्हास, जयश्री, संध्या, राजश्री, जितेंद्र, मुमताज, नंदा आदी तारे चित्रपटसृष्टीला मिळाले.चित्रपती व्ही. शांताराम यांनी ९ नोव्हेंबर १९४२ रोजी (दिवाळी-पाडवा) मुंबईतीलपरळ भागात राजकमल कलामंदिर हा स्टुडिओ उभारला. भारतीय चित्रपटांचा इतिहासच तेथे रचला गेला. या वर्षी स्टुडिओचा अमृत महोत्सव साजरा होत आहे.
राजकमल कलामंदिर : सिनेमाच्या सुवर्णयुगाचा साक्षीदार,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 4:29 AM