मुंबई - वाऱ्याच्या वेगाने पुतळा पडला हे काही उत्तर नाही. या गोष्टींचा विचार याआधी व्हायला हवा होता. घाईगडबडीने जे असे निर्णय घेतले ते पोषक नाही. पुतळा उभारताना ज्या काही जाचक अटी असतात त्या सगळ्यांचा सखोल अभ्यास होणं आवश्यक आहे. आता या घटनेनंतर राजकारण व्हायला लागलं आहे त्यात दुमत नाही. पूर्वी गडकोट किल्ल्यांवर न बोलणारे लोक आता बोलतायेत ही आनंदाची बाब आहे असा टोला माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.
राजकोट किल्ल्यावरील घटनेनंतर संभाजीराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी स्वत: गडकोट किल्ल्यांबाबत अनेक वर्ष काम करतोय. हे आंदोलन बघून मला शॉकिंग वाटलं. या निमित्ताने सगळे बोलायला लागलेत. विशालगडावरील अतिक्रमणावर मी भूमिका घेतली, सगळ्या धर्मातील लोक तिथे घुसले होते. सगळ्यांना काढा असं मी बोललो त्यावर कुणी चर्चा केली नाही. परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांबाबत जे प्रेम दाखवायला लागलेत ती चांगली बाब आहे असं त्यांनी विरोधकांना म्हटलं.
तसेच गडकोट किल्ल्यांसाठी तुम्ही काय केले हे महायुती आणि महाविकास आघाडीनं सांगावे. किती पैसे खर्च केलेत? रायगड किल्ल्याबाबत मी पुढाकार घेतला त्यामुळे त्याचे जतन संवर्धन सुरू आहे. बाकी कुठल्या किल्ल्याचे सुरू आहे? काहीच नाही. ३५० वर्ष झाली, गेल्या वर्षभरात महायुती सरकारने गडकोट किल्ल्यांसाठी काय केले ते बोलावे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे आजोबा जेव्हा परदेशात गेले, इटलीत त्यांचे निधन झाले. तिथे आजही त्यांची समाधी आहे. इतक्या सुंदर पद्धतीने ते सांभाळतात. इटलीचे सरकार सांभाळ करतात परंतु आपले सरकार या वास्तू का सांभाळत नाही? असा सवालही छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी केला.
दरम्यान, राजकोटच्या किल्ल्यासाठी कला संचालनायलाने परवानगी दिली होती का? पुतळा उभारण्यासाठी सरकारने काही नियमावली बनवली आहे. त्यावर चर्चा व्हायला हवी. मी १२ डिसेंबर २०२३ ला पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होते. हा पुतळा साजेशा नाही, कामही पूर्णत्वास नाही त्यामुळे तो बदलावा अशी मागणी केली होती. दुर्दैवाने आज तो पुतळा पडला. महाराष्ट्राच्या दृष्टीने ती दुर्दैवी आहे. जे घडायला नको ते घडलेले आहे. साधा शिवाजी महाराजांचा पुतळा गावातही उभा करायचा असेल तर त्याला अनेक अटी असतात. पंतप्रधान, राष्ट्रपती उद्धाटनाला येतात तेव्हा अधिक जाचक अटी असतात, त्याचे पालन झाले का याची चौकशी होणे गरजेचे आहे असंही छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं.