मुंबई – राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावर नियमबाह्य आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करण्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला होता. याबाबतचं पत्र देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलं होतं. राजकुमार ढाकणे असं या राष्ट्रवादी नेत्याचं नावं आहे. फडणवीसांच्या पत्रानंतर आता राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावरून राजकुमार ढाकणे यांची हकालपट्टी केली आहे. गृहविभागाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.
राज्य पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राज्य सरकारला राजकुमार ढाकणे यांच्याबाबत रिपोर्ट सोपवला. त्यात राजकुमार ढाकणे यांच्याविरोधात गंभीर गुन्हे नोंद असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे तात्काळ राजकुमार ढाकणेंना राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या सदस्य पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १४ जुलै २०२० रोजी गृहविभागाने अधिसूचना जारी करत राजकुमार ढाकणे यांची राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावर सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. महाराष्ट्र पोलीस अधिनियमातंर्गत ही नियुक्ती झाली होती.
त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकुमार ढाकणे यांच्या नियुक्तीला आक्षेप घेत चौकशीची मागणी केली होती. तसेच याबाबत फडणवीसांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं होतं. त्यानंतर ढाकणे यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी या प्रकरणाची चौकशी केली. २०१५ मध्ये राजकुमार ढाकणे यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पुण्यातील कोरेगाव पोलीस स्टेशनात नोंद आहे असं चौकशी अहवालात नमूद आहे. त्याच आधारे ढाकणे यांची हकालपट्टी केली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी पत्रात काय म्हटलं होतं?
पोलिसांविरोधातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी राज्यात पोलीस तक्रार प्राधिकरण गठीत करण्यात आलं. त्याला सत्र न्यायालयाच्या समान अधिकार आहेत. संपूर्ण राज्यातील कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांविरोधातील तक्रारींची निपटारा करण्यासाठी हे प्राधिकरण असल्याने यातील नियुक्त्या डोळ्यात तेल घालून व्हायला हव्यात. पण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची नेमणूक होत असेल तर ते अतिशय गंभीर आणि पोलिसांचे मनोबल खच्चीकरण करणारे आहे. सुमारे पावणे तीन लाख वेतन या पदासाठी आहे. गृहमंत्रालयाने विशेष अधिकार वापरून राजकुमार ढाकणेंची नियुक्ती केली आहे. हत्येचा प्रयत्नसारखे गुन्हे त्यांच्यावर नोंद आहेत. पोलिसांच्या ताब्यातून पळाल्याचाही आरोप आहे. मग कुठलीही शहानिशा न करता ही नियुक्ती कशी झाली? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला होता.
कोण आहे राजकुमार ढाकणे?
राजकुमार ढाकणे हे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसपासून पक्ष संघटनेत कार्यरत आहेत. गेली १७ वर्ष ते राजकारणात आहेत. तसेच ते उद्योजक आहेत. पुणे शहरातील येरवडा, गांधीनगर, फुलेनगर, शास्त्रीनगर, जयप्रकाश नगर याभागात त्यांचे वर्चस्व आहे.