नामदेव मोरे / नवी मुंबई रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या राजमाता जिजाऊ स्मारक व पाचाडच्या वाड्याची दुरवस्था झाली आहे. वाड्याकडे जाण्यासाठी पक्का रस्ता करण्यात शासनाला अपयश आले आहे. वाड्याची संरक्षण भिंत कोसळली आहे. समाधीस्थळी असलेला माहिती फलक गंजला आहे. उद्यानामधील सर्व खेळणी तुटली असून, दोन्ही राष्ट्रीय स्मारकांच्या परिसरामध्ये पर्यटकांसाठी एकही प्रसाधनगृह नसल्याने इतिहासप्रेमींमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रामधील भव्य स्मारकाचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. प्रस्तावित स्मारकाची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे; पण सद्यस्थितीमध्ये अस्तित्वात असलेल्या स्मारकांची देखभाल करण्याकडे मात्र राज्य व केंद्र शासनास अपयश आले आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावातील राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची समाधी व त्यांचा वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आला आहे; पण प्रत्यक्षात या दोन्ही स्मारकांची योग्य देखभाल केली जात नाही. पाचाडच्या वाड्याकडे जाण्यासाठी अद्याप रस्ताही करण्यात आलेला नाही. पायवाटेने या भुईकोट किल्ल्यावर जावे लागते. किल्ल्यामध्ये वाड्याचे फक्त अवशेष आहेत. किल्ल्याच्या एक बाजूची संरक्षण भिंत कोसळली आहे. या भिंतीच्या दुरुस्तीचे काम अद्याप सुरू झालेले नाही. वेळेत भिंत पुन्हा बांधली नाही व उरलेल्या संरक्षण भिंतीचीही डागडुजी केली नाही, तर पूर्ण संरक्षण भिंतच कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाड्याची रचना अत्यंत नियोजनबद्दपणे केली आहे. वाड्यामध्ये विहिरीपासून भुयारीमार्गापर्यंत सर्व रचना केली आहे; पण त्याची माहिती देणारा एकही फलक या परिसरात लावलेला नाही. पाचाडच्या वाड्याप्रमाणेच स्थिती जिजाऊंच्या समाधीस्थळाची आहे. पुरातत्त्व विभागाने समाधीच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. कर्मचारी साफसफाईही उत्तमप्रकारे ठेवत आहेत; पण समाधीसमोरील कारंजा कधीच बंद पडला आहे. समाधीकडे जाताना बसविण्यात आलेल्या माहिती फलकाला गंज लागला आहे. प्रवेशद्वारावरील स्वागतकमान व दरवाजा लोखंडी फ्रेममध्ये तयार केला असून, त्याला गंज चढला आहे. स्मारकाच्या बाजूला वनविभागाने उद्यान निर्माण केले आहे. उद्यानामध्ये लहान मुलांसाठी खेळण्यासाठी घसरगुंडी, झोपाळे व इतर खेळणी बसविण्यात आली आहेत. येथील सर्वच्या सर्व खेळणी तुटली आहेत. उद्यानामध्ये हिरवळ दिसतच नाही. समाधीस्थळावर येणाऱ्या नागरिकांसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. पाचाड बसस्थानक ते दोन्ही समाधीस्थळ परिसरामध्ये एकही प्रसाधनगृह नाही. यामुळे पर्यटकांची गैरसोय होत आहे. पाचाडवासीयांना मिळेना पाणी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या पाचाड गावामध्ये पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासही शासन अपयशी ठरले आहे. गावातील विहिरींचे पाणी मार्च महिन्यापर्यंत पुरते. जूनअखेरपर्यंत पिण्यासाठीही पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. च्समाधीस्थळाजवळील विहिरीवरून प्रत्येक घरासाठी दोन हांडे पाणी देण्यात येते. पिण्याव्यतिरिक्त कामासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. पाणीटंचाईमुळेच गावचा विकास खुंटला असून, जिजाऊ माँसाहेबांचे समाधीस्थळ व परिसरातील नागरिकांना १२ महिने मुबलक पाणी कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसृष्टी कागदावरच पाचाड गावामध्ये १०० एकर जमिनीवर शिवसृष्टी उभारण्याची घोषणा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गतवर्षी केली होती; पण अद्यापही शिवसृष्टी कागदावरच आहे. जमिनीचे सर्वेक्षण व संपादन करण्यामध्ये वर्ष खर्ची पडले आहे. शासनाने शिवसृष्टी उभारण्यापूर्वी दोन्ही राष्ट्रीय स्मारकाची डागडुजी व देखभाल करण्यासाठी उत्तम व्यवस्था करावी, अशी मागणी शिवप्रेमी करू लागले आहेत.
रस्ताही नाहीपाचाडमधील भुईकोट किल्ला बांधून जवळपास साडेतीनशे वर्षे झाली आहेत. मुख्य रस्त्यापासून वाड्याकडे जाण्यासाठी २०० मीटर अंतर आहे. पक्का रस्ता नसल्याने पायवाटेने जावे लागते. पुरातत्त्व विभागाने रोडवर एक सूचना फलक लावून स्मारकाची माहिती दिली आहे; पण एवढ्या वर्षांत साधा रस्ता किंवा पायऱ्या बनविण्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे इतिहासप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.