ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सुरक्षा दलांचा वापर कमीत कमी केला गेला पाहिजे, असे मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान झालेला बळाचा वापर आणि मध्य प्रदेशात मंदासोर येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच आंदोलक शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी आज मुंबईत हे वक्तव्य केले .
मध्य प्रदेशात शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबार प्रकरणी राजनाथ सिंह म्हणाले, "शेतकरी आंदोलनामध्ये सुरक्षा दलांचा कमीत कमा वापर व्हायला हवा. भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत संवेदनशील आहे. मात्र सध्या अडचणीचा काळ आहे. शेतकऱ्यांनी मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना सहकार्य करावे ते समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करताहेत."
यावेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्यानिमित्ताने राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. ""शेतक-यांच्या दुर्दशेला काँग्रसच जबाबदार आहे. हा देश शेतकऱ्यांचा आणि गरीबांचा आहे, याचा काँग्रेसला विसर पडलाय. त्यामुळेच आज शेतकरी दुरावस्थेत आहेत."" असा टोला त्यांनी लगावला.
एनडीएची तीन वर्षांची वाटचाल यशस्वी ठरली आहे. देशी आणि आंतरराष्टीय संस्थाच्या सर्वेक्षणातूनही सरकार लोकांच्या अपेक्षांवर खरे उतरल्याचे अहवाल आले आहेत. सुशासनाला कटीबद्ध असे सरकार लोकांना हवे होते त्यात आम्ही यशस्वी ठरलो, असा दावाही राजनाथ सिंह यांनी यावेळी केला.
"देशातील आर्थिक सुधारणांना मोदी सरकारने गती दिली आहे. आजवर केवळ आर्थिक संकटातच आर्थिक सुधारणा केल्या गेल्या. मोदी सरकार मात्र आर्थिक स्थिती उत्तम असताना सुधारणा करणारे पहिले सरकार ठरले आहे. स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी आर्थिक सुधारणा म्हणजे जीएसटी असून, ही करप्रणाली भारतासाठी गेम चेंजर ठरेल," असे राजनाथ सिंह म्हणाले.
सरकारने दहशतवाद आणि नक्षलवाद रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचाही त्यांनी आवर्जुन उल्लेख केला, पूर्वोत्तर राज्यातील दहशतवादी घटना रोखण्यात सरकारला मोठे यश मिळाले आहे. स्वतंत्र भारतातील इतक्या परिणामकारकपणे पूर्वोत्तर राज्यातील दहशतवाद रोखणारे हे पहिलचे सरकार आहे. तसेच नक्षलवादाविरोधात संबंधित राज्यांना केंद्र सरकार पूर्ण पाठिंबा देत आहे. सद्यस्थितील नक्षलवाद्यांच्या अटकेत 180 टक्क्यांची वाढ झाली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.