ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात विरोधकांनी दंड थोपटलेले असतानाच मित्रपक्ष शिवसेनाही विरोधकांशी हातमिळवणी करत रस्त्यावर उतरल्याने भाजपाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. रागावलेल्या सेनेची समजूत काढण्यासाठी खुद्द गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी फोनवरून संवाद साधल्याचे वृत्त आहे.
बुधवारी रात्री राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचे समजते.
तृणमूल काँग्रेसने नोटाबंदीविरोधात दिल्लीत काढलेल्या मोर्चात शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत आदी सहभागी झाले होते. तसेच उद्धव ठाकरे यांनीही वेळोवेळी सरकारच्या या निर्णयावर टीका करत नाराजी व्यक्त केली होती. मित्रपक्षही विरोधकांच्या गोटात सामील झाल्यास ही बाब हिवाळी अधिवेशनात भाजपासाठी डोकेदुखी ठरू शकते. हेच लक्षात घेऊन काल रात्री राजनाथ यांनी दूरध्वनीवरून उद्धव यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्याचे समजते. शिवसेनेची भूमिका समजून घेण्यासाठी राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरेंशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं असल तरीही त्याच्या अमलबजावणीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीपासूनच भाजपा-शिवसेनेत काही ना काही कुरबुरी सुरूच आहेत. सत्तेत सहभागी असूनही दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यांच्यातील दुरावा दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. केंद्र आणि राज्य मंत्रिमंडळातही अपेक्षित वाटा मिळालेला नसल्याने सेना नाराज असून आता नोटाबंदीच्या मुद्यावरूनही उद्धवनी सरकारवर निशाणा साधला आहे.