मुंबई : राज्य पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या जागी नवीन चेहरे आणण्याचा राज्य सरकारचा सध्या कोणताही विचार नाही. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना याबाबतचे संकेत दिले. सेठ आणि फणसाळकर यांना लगेच बदलणार का, या पत्रकारांच्या प्रश्नात फडणवीस यांनी थेट उत्तर दिले नाही. त्यांचे काम ठीक चालले आहे. फणसाळकर तर आता नवीनच आले आहेत ना, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. दोघांचीही नियुक्ती ही महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली होती. त्यामुळे शिंदे - फडणवीस सरकार येताच दोघांनाही बदलले जाईल, अशी चर्चा सुरू झाली. त्यातच सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात राज्य सरकारने क्लीन चिट दिल्यानंतर त्या राज्यात परतणार असल्याच्या चर्चेला वेग आला. त्या पोलीस महासंचालक वा मुंबई पोलीस आयुक्त म्हणून येऊ शकतात, असे तर्कही दिले गेले. नवीन सरकारच्या त्या विश्वासातील मानल्या जातात. फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर आकसाने कारवाई करण्यात आल्याची भूमिका फडणवीस यांनी आधीपासूनच घेतली आहे.
रश्मी शुक्ला यांचे महासंचालक म्हणून केंद्रात एम्पॅनेलमेंट होण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्या स्वत:ही इच्छुक असल्याचे समजते. जून २०२४मध्ये त्या निवृत्त होणार आहेत. त्यामुळे राज्यात लगेच परत येण्याची त्यांची इच्छा नसल्याचे म्हटले जाते. एम्पॅनेलमेंटपूर्वीच शुक्ला यांना राज्यात पाठविण्याची भूमिका मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे मांडली तर मात्र त्या राज्यात परतू शकतील.
सेठ यांची नियुक्ती आधीच्या सरकारने केली असली तरी त्यांच्याबाबत शिंदे - फडणवीस यांचा कोणताही आक्षेप वा विरोध नसल्याचे सांगण्यात येते. सेठ हे डिसेंबर २०२३मध्ये निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी नवीन चेहरा आणण्याचा विचार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर होऊ शकतो, असे सुत्रांनी सांगितले.