ऑनलाइन लोकमतपुणे, दि. २२ : कुख्यात गजा मारणे टोळीचा सराईत गुंड सागर रजपूत याला विश्रामबाग पोलिसांनी निलेश घायवळ टोळीच्या अमोल बधे खून प्रकरणात अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाच्या(उत्तर विभाग) सहायक निरीक्षक आणि पोलीस कर्मचा-यावर रजपूतने गुजरातमधील बडोद्यात गोळीबार केला होता. या घटनेत दोन्हीही पोलीस गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, या दोघांनाही सोमवारी पुण्यामध्ये आणण्यात आले असून एका खासगी रुग्णालयात त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
रजपूत न्यायालयाने 3 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली. गजा मारणे आणि निलेश घायवळ टोळीयुध्दामधून अमोल बधे याचा दिड वर्षांपुर्वी वैकुंठ स्मशानभुमीजवळ भर दिवसा गोळ्या झाडून तसेच धारदार हत्यारांनी वार करुन खून करण्यात आला होता. या गुन्ह्यात पुणे शहर पोलिसांनी गजा मारणे टोळीविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई केली होती. गजा मारणेसह त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. सध्या ही सर्व टोळी येरवडा कारागृहात बंद आहे.
मात्र, गुन्हा घडल्यापासून सागर रजपूत फरार होता. तो बडोद्यामध्ये रहात असल्याची माहिती मिळाल्यावर सहायक निरीक्षक रणजित भोईटे व कर्मचारी दिलीप मोरे हे त्याची माहिती काढण्यासाठी गेले होते. त्याच्याशी झालेल्या चकमकीदरम्यान त्याने या दोघांवर गोळीबार केला होता. यामध्ये मोरे यांची यांच्या पाठीत गोळी घुसून ती पोटापर्यंत गेली. तर, भोईटे यांच्या पायाला गोळी लागली होती. गोळीबारात रजपूत देखील जखमी झाला होता.
याप्रकरणी रजपुत याच्यावर बडोदा येथील नवापूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला बडोदा पोलिसांनी अटक केली होती. त्याची बडोद्यातील पोलीस कोठडी संपल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याचा ताबा घेतला. त्याला अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले. पुणे ग्रामीण पोलिसही त्याला ताब्यात घेणार असून घायवळ टोळीच्या पप्पू गावडे खून प्रकरणात रजपूत फरार आहे.