Rajratna Ambedkar News: एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपांवरून बैठकांचे, चर्चांचे सत्र सुरू आहे. तर दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू एकत्रितपणे परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी करत सक्षम पर्याय देण्यासाठी कंबर कसून तयारीला लागले आहेत. यातच मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापताना पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत चढाओढ कायम असताना आता मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, असे तिसऱ्या आघाडीतील असे म्हटले आहे.
सगेसोयरेंची अंमलबजावणी, कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीतून मराठा आरक्षण मिळण्यासाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सुरू केलेले उपोषण स्थगित केले. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील बीड जिल्ह्यातील नारायण गडावर दसरा मेळावा घेणार असल्याचे निश्चित केले आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अल्टिमेटम मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून, यासाठी दौरे, बैठका सुरू केल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील काही आंदोलने प्रायोजित आहेत. सागर बंगल्यातून हे सगळे नियंत्रित केले गेले आहेत, असा मोठा आरोप राजरत्न आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. यावेळी तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, असा प्रश्न राजरत्न आंबेडकर यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे पाटील असतील, असे म्हटले आहे.
दरम्यान, परिवर्तन महाशक्ती आघाडीतील घटक पक्षांचे नेते मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी जवळीक साधताना दिसत आहेत. उपोषण स्थगित केल्यानंतर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची परिवर्तन महाशक्ती आघाडीतील नेत्यांनी भेट घेतली होती. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या नेत्यांमध्ये संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांचा समावेश होता.