सुधीर लंके - पुणे ‘लेक वाचवा’ मोहिमेअंतर्गत राज्य सरकार गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करीत असले, तरी ‘मुलगाच हवा’ ही मानसिकता समाजात अजूनही मूळ धरून आहे. दुसरीकडे खात्रीशीर पुत्रजन्माचा नेटवरून (संकेतस्थळ) राजरोसपणे बाजार मांडण्यात आला असून, कुटुंबकल्याण विभागाने मात्र त्याकडे डोळेझाक केली आहे.‘मुलगा जन्माला कसा घालाल?’ याबाबतच्या औषधांची थेट इंटरनेटवरच जाहिरात केली जात आहे. एका संकेतस्थळावर पुत्रप्राप्ती होण्यासाठीच्या कथित गोळीची जाहिरात आहे. त्यात जलदगतीने गर्भधारणा कशी करावी, तसेच आयुर्वेदिक गोळ्या घेऊन ‘मुलगाच कसा जन्माला घालावा?,’ याबाबतचा थेट उल्लेख करण्यात आलेला आहे. गर्भलिंग निदानाविरोधात काम करणारे कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी पुणे महापालिकेकडे १२ पुस्तकांची यादीच दिली आहे. यावर कारवाई करण्यासाठी वकिलांचा सल्ला घेत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.गर्भधारणा व प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियम २००३ मधील कलम २२ नुसार गर्भलिंग निदानाबाबत जाहिरात करण्यास बंदी आहे. आम्ही सरकारकडे तक्रार केली असून, लवकरच जनहित याचिका दाखल करणार आहोत. - अॅड. वर्षा देशपांडे, केंद्रीय सदस्य ‘बेटी बचाव अभियान’
खात्रीशीर पुत्रजन्माचा नेटवरून राजरोस बाजार
By admin | Published: March 08, 2015 2:45 AM