मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुन्हा मराठीचा ‘राग’ आळविला. राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मराठी माणसांनाच मिळाला पाहिजे, उद्योगांमध्ये मराठी मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. यासाठी अधिवास धोरण जाहीर करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. राज आज सकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी गेले. ही भेट पूर्वनियोजित होती. ‘वर्षा’वरून कालच त्यांना भेटीची वेळ देण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेल्या मराठी बाण्याची माहिती राज यांनी नंतर पत्र परिषदेत दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील गोष्टींचा फायदा येथीलब लोकांना झाला पाहिजे. मोफत घरांच्या योजनेचा लाभ परप्रांतियांनीच घेतला. इथे महाविद्यालये निघतात आणि त्यात भलतेच शिकतात. प्रत्येक बाबतीत डोमिसाईल सर्टिफिकेट सक्तीचे केले पाहिजे. झारखंड सरकारप्रमाणे आपणही डोमिसाईलचे धोरण आणले पाहिजे. रिक्षा, टॅक्सी परवाने मराठी तरुणांनाच दिले पाहिजेत. मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याची घोषणा मागे याच सरकारने केली होती. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केवळ गाजावाजा केला. त्याचे काय झाले हेही आपण मुख्यमंत्र्यांना विचारले. लवकर निर्णय झाला नाही तर आंदोलन करू. मग कोर्टाच्या अवमानाची वगैरे चिंता करणार नाही, असा इशारा राज यांनी दिला. मुंबईचे टोलनाके बंद झाले पाहिजेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले. नाशिक महापालिकेला राज्य शासनाकडून येणे असलेले १९० कोटी रुपये तातडीने द्यावेत, अशी मागणी राज यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. हा निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे, असे राज यांनी पत्रकारांना सांगितले. (विशेष प्रतिनिधी)लोक यांनाच मते का देतात? - मुंबई महापालिकेत अनेक वर्षे त्यांची सत्ता आहे. रोड टॅक्स घेऊनही ते चांगले रस्ते, मोकळे फुटपाथ देऊ शकत नाहीत. तरीही दरवेळी लोक त्यांनाच मतदान करणार असतील तर सगळा आनंदीआनंद आहे ,अशा शब्दात राज ठाकरे यांनी शिवसेनेबद्दलची नाराजी व्यक्त केली.मुंबईत खराब रस्ते बांधणाऱ्या दोन काँट्रॅक्टरना बोलवा आणि कानफाडून काढा. नाहीतर आमच्याकडे सोपवा. इतकी वर्षे काय होतं ते बरोबर सांगतील,असे ते म्हणाले.
राज यांचा पुन्हा मराठी ‘राग’
By admin | Published: August 18, 2016 6:17 AM