मुंबई : नव्या वर्षाची सुरुवात मराठी ग्रंथ विक्रेत्यांसाठी, वितरकांसाठी आणि रसिक वाचकांसाठी उत्साहवर्धक ठरली आहे. महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या गाळ्यांतील ५०० ते १००० चौरस फूट आकारमानाचा गाळा मराठी पुस्तकांच्या विक्रीसाठी अल्प भाड्याने देण्यात येणार आहे.ही सवलत जाहीर करणारे शासन परिपत्रक शुक्रवारी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने काढले आहे. गेल्या वर्षी घुमान येथे झालेल्या साहित्य संमेलनात बोलताना सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मराठी पुस्तकांच्या विक्रीसाठी नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात गाळ्यांना सवलतीच्या दरात भाडे आकारण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्याच व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घोषणेला त्वरित दुजोरा देऊन याबाबत लवकर निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले होते.दरम्यानच्या काळात मराठी भाषा विभागाने नगरविकास खात्याकडे प्रस्ताव पाठवला आणि पाठपुरावा केला; आणि याविषयी निर्णयाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू झाली. हा मराठी साहित्याला व वाचन संस्कृतीला चालना देणारा निर्णय आहे. यामुळे पुस्तक खरेदीचे अनेक पर्याय रसिक वाचकांना उपलब्ध होतील आणि वितरकांना व प्रकाशकांनाही आर्थिक गणित साधणे सोपे जाईल, असे प्रतिपादन तावडे यांनी केले. तसेच पुणे, मुंबई वगळता अन्य शहरी व निमशहरी भागांतील इच्छुक मराठी पुस्तक विक्रेत्यांनी व वितरकांनी या सवलतीचा अधिकाधिक प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहनही तावडे यांनी केले. (प्रतिनिधी)वितरण प्रक्रियेतील त्रुटी लक्षात घेऊन शासनाने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे वाचनसंस्कृती वाढीस लागेल, असा विश्वास आहे. मात्र मराठी साहित्य विश्वाच्या समृद्धीसाठी प्रकाशक, विक्रेत्यांनी चौकटीपल्याड जाऊन ग्रंथविक्रीसाठी नव्या उपाययोजना अवलंबिल्या पाहिजेत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पुस्तक नेण्याची प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करावी लागते, त्यामुळे ग्रंथप्रदर्शन, ग्रंथयोजना, सवलत अशा विविध गोष्टींचा विचार झाला पाहिजे. जेणेकरून वाचकांना अधिकाधिक ग्रंथसंपदा सहज उपलब्ध होईल, असे पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ यांनी सांगितले.वाचनाची अभिरुची वाढेल तरुण वर्गाची नाळ वाचनाशी जोडण्यासाठी मराठी साहित्य त्यांना पाहण्यासाठी, चाळण्यासाठी उपलब्ध झाले पाहिजे. त्यानंतर या पिढीत वाचनसंस्कृतीची बीजे रोवली जातील. सध्या केवळ मुंबईचा विचार करायचा झाला तर शहर-उपनगरात ठरावीक ठिकाणीच ग्रंथ उपलब्ध होतात. दादर, गिरगाव, ठाणे आणि पार्ले यांच्या पलीकडे वाचकांना साहित्य उपलब्ध होत नाही. परंतु, या निर्णयाच्या माध्यमातून गावखेड्यांपर्यंत अंमलबजावणी झाल्यास साहित्य आणि वाचकांमध्ये निर्माण झालेली दरी कमी होईल. - अशोक नायगावकर, कवीसकारात्मक निर्णयपुस्तक विक्रेते आणि प्रकाशकांसाठी हा निर्णय अत्यंत सकारात्मक आहे. ‘दहा बाय दहा’च्या जागेत पुस्तकांच्या विक्रीचा व्यवसाय शक्य नाही. अतिशय नाजूक पद्धतीने पुस्तके हाताळावी लागतात. शिवाय, नव्या पुस्तकांप्रमाणे जुनी पुस्तकेही दुकानात ठेवावी लागतात. तसेच, पुस्तकांचा ‘डिस्प्ले’ हा मुद्दाही सध्या महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सर्व मुद्द्यांचा विचार करून घेतलेला हा निर्णय अधिकाधिक वाचकांना साहित्याशी जोडण्यास मदत करेल, असे मॅजेस्टीक प्रकाशनाचे अशोक कोठावळे यांनी सांगितले.
मराठी ग्रंथविक्रीला राजाश्रय
By admin | Published: January 02, 2016 8:34 AM