नवी मुंबई- अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणातील आरोपी राजू पाटीलला 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षापासून बेपत्ता असलेली महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे ( गोरे ) यांच्या बेपत्ता प्रकरणानं राज्यभरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरला अटक केली आहे.बिद्रे प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकर याच्या तपासानंतर पोलिसांनी आणखी एका आरोपीचा काल शोध लावला होता. जळगावमधल्या ज्ञानदेव दत्तात्रेय पाटील ऊर्फ राजू पाटील याला कळंबोली पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद केला असून, त्याला आज 11 रोजी दुपारी पनवेल कोर्टात हजर केले. न्यायालयानं राजू पाटीलला 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 364, 323, 497, 506 (2) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानदेव पाटील हा एकनाथ खडसे यांचा भाचा असल्याची माहिती समोर आली होती. अश्विनी बिद्रे यांच्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत असताना यातील नेमके धागेदोरे शोधण्यासाठी पोलिसांना मोठे आव्हान उभे असताना ज्ञानदेव पाटील सारखा आरोपी ताब्यात घेण्यात पोलिसांना मोठे यश आलं आहे .अश्विनी बिद्रे प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्या मोबाईल संभाषणाचे रेकॉर्ड पोलिसांना प्राप्त झालेली असून, या अनुषंगाने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी अश्विनी बिद्रे या बेपत्ता झाल्या व त्यांचे शेवटचे असलेले लोकेशन नंतर त्याच वेळी अभय कुरुंदकरने ज्ञानदेव पाटील याला संपर्क केल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.
अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणातील आरोपी राजू पाटीलला 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 4:18 PM