कोल्हापूरः बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. यातच, आता स्वाभिमानी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनीही यावर भाष्य केले आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या किती झाल्या? यावर कोणी चर्चा करणार आहेत का? असा उद्विग्न सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येबाबत सध्या जी चर्चा सुरू आहे, तेवढी चर्चा सर्वसामान्यांच्या प्रश्नावर झाली असती तर सर्व प्रश्न सुटले असते. आत्महत्या करणारा कोण आहे, हे बघून चर्चा होणार असेल तर आपण कुठे निघालो आहोत हे लक्षात येते. आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, पण त्याची चर्चा फारशी होत नाही, असे राजू शेट्टी म्हणाले.
याशिवाय, एका अभिनेत्याने केलेल्या आत्महत्येची केवढी चर्चा होते, रोज पोलीस नवनवीन माहिती देत आहेत, तपासाला रोज नवीन दिशा मिळत आहे, त्याच्याकडे असलेल्या कोटी-कोटी रूपयांची चर्चा होत असताना शेतकरी मात्र रूपयाला महाग झाला आहे. त्याला एकेक रूपया म्हणजे गाडीचे चाक वाटत आहे, अशी खंतही राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.
याचबरोबर, कोरोना काळात हाताला रोजगार नाही, काम नाही, अशा स्थितीत विजेचे दर सरकारने वाढवले आहेत. हे पैसे कसे भरायचे, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला. महावितरण कंपनीचा अनागोंदी कारभार सुरु आहे, रीडिंगही गेल्या वर्षीच्या सरासरीने काढले आहे, त्यामुळे स्थिर आकारही वाढला आहे, त्यामुळे विजबिल वाढून आला आहे. क्रिकेट पटू पासून सामान्य नागरिकांपर्यंत विजबिल वाढलेले आहे. यामुळे वीज वितरण कंपनी हि चेष्टेचा विषय बनली आहे, असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.