गेल्या काही महिन्यांपासून विधान परिषदेत नियुक्ती करण्यासाठी देण्यात आलेल्या १२ आमदारांच्या यादीबाबत अद्यापही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे प्रलंबित आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजभवनावर जाऊन भेट घेतली. यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नावावरून संभ्रम निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शेट्टी यांच्या नावास आक्षेप घेतल्याचं सांगितले जात असून, राष्ट्रवादी काँग्रेसनं शेट्टींचे नाव वगळण्याचा निर्णय घेतल्याचीही एक चर्चा आहे. एकूणच प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मौन सोडले असून, याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. दरम्यान, राजू शेट्टी यांनीदेखील यादीवरून प्रतिक्रिया दिली.
"आता १२ आमदारात माझं नाव आहे हा मुद्दा नाही, पूरग्रस्तांना न्याय मिळणार आहे का यावर शरद पवार यांनी बोलावं," असं राजू शेट्टी म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या "आक्रोश पूरग्रस्तांचा, परिक्रमा पंचगंगेची" ही पदयात्रा शनिवारी इचलकरंजीत पोहोचली. त्यावेळी राजू शेट्टी यांनी ही प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले होते पवार?"ते नाराज असतील, तर त्याबाबत काही म्हणायचे नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जी यादी राज्यपालांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्यावतीने दिली आहे, त्यात राजू शेट्टी यांचं नाव आहे. राजू शेट्टी यांनी सहकार आणि शेतीच्या क्षेत्रात जे योगदान दिले आहे, ते लक्षात घेऊन त्यांना विधान परिषदेवर घ्यावं, असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्यपालांकडून आलेला नाही. एकदा आम्ही निर्णय घेतल्यानंतर याबाबतची अंतिम भूमिका ही राज्यपालांना घ्यायची असताना मला आश्चर्य वाटते की, अशा प्रकारची विधान कशी केली जातात. आम्ही आमचं काम प्रामाणिकपणानं केलं आहे. राजू शेट्टींनी काय वक्तव्य केलं त्यावर भाष्य करायचं नाही. दिलेला शब्द पाळला आहे. आता राज्यपाल काय करतात याची आम्ही वाट पाहतोय," अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.