कोल्हापूर: नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही. याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही असे ठरवण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय त्वरीत काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलेत. मात्र, यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी काही उपस्थित केले आहेत. तसेच केवळ शेती करतानाचे फोटो टाकू नका, पहिल्यांदा आमचे पैसे द्या, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ठामपणे सांगितले.
नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ९ ऑगस्टपूर्वी प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम जमा करा अन्यथा क्रांतीदिनी पुणे-बंगळुरू महामार्ग रोको करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकनाथ शिंदे सरकारला दिला. स्वाभिमानीकडून दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यावेळी, ‘कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा... विजय असो’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
एकनाथ शिंदे, केवळ शेती करतानाचे फोटो टाकू नका
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, आज छत्र्या घेऊन आलो आहे, उद्या याचे भाले होतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमचे शेतीत काम केलेले फोटो पाहिले आहेत. मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. पण केवळ फोटो टाकू नका, आमचे पैसे पहिल्यांदा द्या शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळतील. उद्धव ठाकरे यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला पण त्यांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच निघून गेले. निवेदनाची नाटकं करून काही होणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
मंत्रालयावर येण्यास वेळ लागणार नाही
‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील म्हणाले, भरपावसात स्वाभिमानीची ही फौज गोळा झाली आहे, अनुदान तातडीने दिले नाहीतर ही फौज घेऊन मंत्रालयावर येण्यास वेळ लागणार नाही. अनिल मादनाईक यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, वैभव कांबळे, अजित पोवार, सागर संभूशेट्टे आदी उपस्थित होते.