मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. यानंतर नवाब मलिक यांना न्यायालयाने ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. नवाब मलिकांवरील कारवाईनंतर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला असून, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यभरात आंदोलने करण्यात येत आहेत. यातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी निशाणा साधला आहे. एवढा अहंकार बरा नव्हे, असेही म्हटले आहे.
राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. शेतीला सलग १० तास दिवसा वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत आहे. महावितरणच्या वीज निर्मितीमध्ये साखर कारखान्यापेक्षाही मोठा घोटाळा असून, तो लवकरच चव्हाट्यावर आणू. कंपनीमध्ये मंत्र्यांचे लागेबंधे आहेत. जनतेच्या पैशाची सरकारकडून लूट सुरू आहे. शेतकऱ्यांचे वाटोळे महाविकास आघाडी सरकार करत असेल तर मंत्र्यांनाही सोडणार नाही. जनतेला लुबाडायचे, त्यांच्या घरावर दरोडे घालायचे धंदे बंद करावे, अशी घणाघाती टीका राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.
ईडी ब्रह्मदेवापेक्षाही प्रभावी ठरणार नाही याची काळजी घ्या
राजू शेट्टी यांनी एक ट्विट करत थेट अजित पवार यांना इशारा दिला आहे. राजू शेट्टी यांनी एक फोटो ट्विट केला असून, त्यामध्ये ब्रम्हदेव आला तरी वीजबिल माफी नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करताना दिलेल्या कॅप्शनमध्ये, एवढा अहंकार बरा नव्हे ईडी ब्रम्हदेवापेक्षाही प्रभावी ठरणार नाही याची काळजी घ्या, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीकडून मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात येत आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर सकाळी १० वाजल्यापासून महात्मा गांधी पुतळ्याजवळ महाविकास आघाडीतील नेते आंदोलनाला बसले. आंदोलनाच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मत्स्य विकास मंत्री अस्लम शेख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना आमदार यामिनी जाधव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, राज्यमंत्री अदिती तटकरे, शिवसेना नेते सचिन अहिर, महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार संदीप क्षीरसागर आदी नेते उपस्थित आहेत.