कोल्हापूर : ऊस दरावरून निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी बुधवारी मुंबईत सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठकही तोडग्याविना निष्फळ ठरली. मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाला चारशेऐवजी किमान १०० रुपये मिळालेच पाहिजेत, यावर 'स्वाभिमानी'चे नेते राजू शेट्टी ठाम राहिल्याने पेच वाढला. त्यामुळे आज, गुरुवारी सकाळी ११ वाजता पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन आहे.
महामार्गावर शिरोली पुलाजवळ महामार्ग रोखण्यात येणार आहे. संघटनेचे कार्यकर्ते सकाळी आंदोलनस्थळी दाखल होतील. त्यानुसार महामार्ग रोखण्याचे नियोजन आहे. पोलिसांनीही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तयारी केली आहे. पोलीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना ताब्यात घेण्याची शक्यता असली तरी हे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत होणार असल्याचा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.
मागील वर्षीच्या तुटलेल्या ऊसाचे ४०० रुपये आणि पुढील वर्षी उसाला ३५०० रुपये दर द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रात तीव्र आंदोलन पुकारण्यात आले आहे. या मागण्यांकडे राज्य सरकार आणि साखर कारखानदार लक्ष देत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिलेला आहे. तसेच, आम्हाला किमान १०० रुपये मिळाले पाहिजे, असे शेवटचे सांगितले आहे. मात्र, आता यापेक्षा एक रुपया कमी घेणार नाही. जर कारखानदार मुंबईतून येताना पैसे देण्यास तयार झाले तर आजच्या आंदोलनाबाबत विचार करू, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बुधवारी मुंबईत सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मुंबईतील बैठकीत साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, सहकार सचिव राजेश प्रधान यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांचे अध्यक्ष उपस्थित होते. तसेच, राजू शेट्टी हे जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाइन सहभागी झाले होते. त्यावेळी राजू शेट्टी म्हणाले, ज्यावेळी साखरेचे दर कमी होते, अशा अडचणीच्या काळात आम्ही कारखानदारांना सहकार्य केले. आता, चांगले भाव असताना कायद्याची भाषा करीत आहेत.
एफआरपीपेक्षा जादा रक्कम देऊ नये, असा कायदा आहे का? एफआरपीशिवाय दिलेल्या रकमेला शासनाने मान्यता द्यावी, असे राजू शेट्टी यांनी सांगितले. तर आता ही रक्कम देणे शक्य नसल्याचे साखर कारखान्यांचे मत आहे. मागील हंगामातील देता येणार नाही आणि पुढचे किती द्यायचे, हे आताच सांगता येणार नसल्याने आंदोलन थांबवून कारखाने सुरू करावेत, असे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले. मात्र, मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाला चारशेऐवजी किमान १०० रुपये मिळालेच पाहिजेत, यावर 'स्वाभिमानी'चे नेते राजू शेट्टी ठाम राहिल्याने पेच वाढला. त्यामुळे आज पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार आहे.