Maharashtra Politics: राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होत असताना आता शेतकऱ्यांच्या बिऱ्हाड आंदोलनावरून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. नाशिक जिल्हा बँकेकडून कर्जामुळे शेतकऱ्यांवर केलेल्या कारवाईमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी बिऱ्हाड आंदोलन पुकारले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर मुख्यमंत्र्यांच्या घरावर धडकणार असल्याचा थेट इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. तसेच जिल्हा बँकेवरही जोरदार टीका करण्यात आली.
बिऱ्हाड आंदोलनावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आर आणि पारची लढाई घेऊन आता रस्त्यावर उतरले आहेत. प्रश्न सोडवण्याचा निर्धार करून रस्त्यावर आलो आहे. त्यामुळे प्रश्न सुटल्याशिवाय शांत राहणार नाही. लढणाऱ्या लोकांच्या मागे समाज उभा राहतो, असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.
जिल्हा बँकेवर अक्षरशः दरोडा घालणारे नामानिराळे
जिल्हा बँकेवर अक्षरशः दरोडा घालणारे नामानिराळे आहेत. कारवाई होऊ नये म्हणून सत्ताधाऱ्यांशी जुळवूनही घेतले जाते. तर धनदांडग्यांना कर्ज भरण्यासाठी विनंती करायची आणि शेतकऱ्यांवर मात्र कारवाई करायची ही पद्धत येथील बँकांची आहे. लिलाव झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही. सरकारने दिलेले शब्द पाळले नाही, तर शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर १६ फेब्रुवारीला ठाण्याला मुख्यमंत्र्यांच्या दारात सर्व शेतकरी धडकणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
दरम्यान, बँकेचा विषय तुमच्या अखत्यारीत येत नाही. जिल्हा बँकेची सक्तीची कर्जवसुलीही होणार नाही. एकरकमी तडजोडीसंदर्भात निर्णय होईपर्यंत कर्जवसुलीसाठी तगादा लावला जाणार नसल्याची ग्वाही मंत्री दादा भूसे यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"