मुंबई : राज्यात नुकतेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये युतीला फक्त एक जागा जिंकता आली होती. तर भाजपाला कोल्हापुरात एकही जागा मिळवता आली नाही.त्यामुळे याच मुद्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. कोल्हापूरप्रमाणे सांगलीतूनही भाजपला लवकरच हद्दपार करणार असल्याचे ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत १०५ ठिकाणी विजय मिळवणाऱ्या भाजप पक्षाला कोल्हापूर जिल्ह्यात भोपळा ही फोडता आला नाही. विशेष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे होमपीच म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. मात्र असे असताना सुद्धा कोल्हापूर दक्षिणमधून आणि इचलकरंजीतून भाजपच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला होता.
तर याच मुद्याला हात घालत राजू शेट्टी यांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर जिल्ह्यातून आम्ही भाजपला पूर्णपणे हद्दपार केले आहेत. मात्र सांगली जिल्ह्यात थोडफार शिल्लक राहिले आहे. त्यामुळे लवकरच सांगलीतून सुद्धा भाजपला हद्दपार करणार असल्याचे शेट्टी म्हणाले.
तसेच चंद्रकांत पाटील कोल्हापूरमधून कुठूनही उभे राहिले असते, तर त्यांच्या विरोधात मी उभा राहणार असल्याचे त्यांना मी सांगितले होते. त्यामुळे त्यांना पुण्याचा आसरा घ्यावा लागला. एका महिलेला बाजूला करत दादागिरी करून चंद्रकांत पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उभा राहिले असल्याची टीका सुद्धा शेट्टी यांनी यावेळी केली.