सोलापूर, दि. 12- लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. सोलापुरातील पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला आहे. .
मी शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेत गेलो होतो. मात्र कृषी खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्यास पंतप्रधान मोदी यांनी सतत चालढकल केली. यामुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडलो. आमची चळवळ राजकारणासाठी नाही. शेतकऱ्यांच्या अवनतीला सरकारच जबाबदार आहे. शेतकरी भिकारी नाही, त्यांना त्यांचे हक्क हवे आहेत, असं राजू शेट्टी यांनी या पत्रकार परिषदेत म्हंटलं आहे.
केंद्र सरकारने फसवणूक केली, त्यामुळे देशभरातील सर्व शेतकरी संघटना एकत्र आल्या आल्या आहेत. 162 शेतकरी संघटनांची मिळून शेतकरी संघर्ष समन्वय समिती स्थापन झाली आहे. अखिल भारतीय किसान सभेचे माध्यमातून आंदोलन तीव्र करू आणि सरकारला गुडघे टेकण्यास भाग पाडू, असा थेट इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावरही टीका केली आहे. सदाभाऊ खोत यांनी दुसरी शेतकरी संघटना काढण्याची घोषणा केली असली तरी त्यामुळे फारसा गुणात्मक फरक पडणार नाही, असं राजू शेट्टी यांनी म्हंटलं आहे.