मुंबई - दूध दरवाढीच्या मुद्यावरून आज राज्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये राज्यातील विरोधी पक्ष असलेला भाजपाही आक्रमकपणे उतरला आहे. राज्यातील अनेक भागात भाजपाच्या नेत्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. दरम्यान, राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आंदोलनात सहभाग घेत राज्यातील महाविवास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दूध भुकटीच्या आयातीबाबत करण्यात येत असलेल्या आरोपांनादेखील प्रत्युत्तर दिले. महाविकास आघाडीचे नेते केंद्र सरकारने दूध भुकटीची आयात केल्याचा आरोप करत आहेत. मात्र केंद्र सरकारने एक ग्रॅमही दूध भुकटी आयात केलेली नाही. यावेळी फडणवीस यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यावरही टीका केली. राजू शेट्टी हे आता सरकारी आंदोलक झाले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.दरम्यान, दूध दरवाढीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकरी संघर्ष समितीने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यातील विविध भागात आज पहाटेपासूनच आंदोलनाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी दुधाचे टँकर अडवले असून, महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक दगडाला अभिषेक करून तसेच ग्रामदेवतांना दुग्धाभिषेक घालून शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला आहे. तसेच दुधाला प्रतिलिटर १० रुपये अनुदान देण्याची मागणी केली.राज्यातील औरंगाबाद, जालना, अमरावती, सांगली, अकोला, पंढरपूर, पुणे आदी भागात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या दूध आंदोलनामध्ये महायुतीमधील घटक पक्षही सभागी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या गाई व म्हशीच्या दुधाला व शेत मालाला रास्त भाव मिळावा यासाठी मागणीसाठी शिंदखेडा येथे आमदार जयकुमार रावल याच्या आदेशान्वये कामराज निकम याच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले. तर सोलापूरमध्ये महायुतीच्या वतीने वाघोली (ता. मोहोळ) येथे महादेवाला दुग्धाभिषेक घालून व गरजूंना दूध वाटप करून आंदोलन सुरू करण्यात आले.दूध उत्पादकांना प्रति लिटर दुधामागे दहा रुपये अनुदान मिळावे तसेच दूध पावडरला पन्नास रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी भाजपच्या वतीने आज नाशिकमध्ये विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. मुंबई आग्रा महामार्गावर दहावा मैल येथे रास्ता रोको आंदोलन करून वाहतूक अडविण्यात आली. दूध किटली घेऊन आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी दुधाला अनुदान मिळालेच पाहिजे तसेच महा विकास आघाडीच्या धोरणाचा निषेध केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल