“मोदी चोर म्हटल्यावर राहुल गांधींवर कारवाई, मग संभाजी भिडेंवर का नाही”; राजू शेट्टींचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 03:26 PM2023-08-05T15:26:12+5:302023-08-05T15:26:40+5:30
Raju Shetty: राहुल गांधींना दिलासा मिळाल्याबाबत भूमिका स्पष्ट करताना, राजू शेट्टींनी संभाजी भिडेंवर टीका केली.
Raju Shetty: मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. राहुल गांधी यांच्यासाठी हा सर्वांत मोठा दिलासा मानला जात आहे. शिक्षेला स्थगिती मिळाल्यामुळे राहुल गांधी यांना खासदारकीही परत मिळणार आहे. राहुल गांधी यांना दिलासा मिळाल्यानंतर इंडिया आघाडीसह अन्य पक्षांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी यावर प्रतिक्रिया देताना संभाजी भिंडेंवर कारवाई का होत नाही, अशी विचारणा केली आहे.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी आणि देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात राज्यातील विविध ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. यावर राजू शेट्टी यांनी टीका केली.
संभाजी भिडेंवर का कारवाई होत नाही
राहुल गांधी यांच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर उच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीबद्दल लोकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे. आपण महापुरुषांची पूजा करतो. येशू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर, महात्मा गांधी साऱ्या जगाचे दैवत आहेत. यांच्याबद्दल अपशब्द काढणे चूक आहे. सगळे मोदी चोर म्हटल्यावर राहुल गांधींवर कारवाई होते मग भिडेंवर का कारवाई होत नाही, अशी विचारणा राजू शेट्टी यांनी केली.
दरम्यान, एनडीए आणि 'इंडिया'मध्ये न जाता स्वतंत्र तिसरी आघाडी घेऊन आम्ही लढणार आहोत. मोठ्या पक्षांनी धंदेवाईक राजकारण केलेले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चळवळीचे प्रश्न घेऊन लढणारे आणि आम्ही आमचे वेगळे व्यासपीठ तयार केले आहे. वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव आल्यास त्यांना सोबत घेण्याचा विचार करु, असे राजू शेट्टी यांनी स्पष्टपणे सांगितले.