सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात ऐन दिवाळीत आरोपांचे फटाके फुटले. खोत यांनी वेळप्रसंगी राजू शेट्टींच्या खांद्याला खांदा लावू, असे जाहीर वक्तव्य करून स्वाभिमानीसोबत जाण्याचे संकेत दिले. त्यावर पलटवार करताना शेट्टी यांनी, फालतू माणसाच्या वक्तव्याला महत्त्व देत नाही. त्यांचे हात व चारित्र्य अस्वच्छ आहे, अशी टीका केली.भाजपने पुणे पदवीधर निवडणुकांसाठी खोत यांनी रयत क्रांतीचा स्वतंत्र उमेदवार दिला होता. राजू शेट्टी यांनी प्रस्थापितांची साथ सोडली, तर निश्चितपणे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करेन, असे वक्तव्य खोत यांनी सोमवारी केले होते. त्यावर शेट्टी यांनी खोत यांच्यावर निशाणा साधला. ज्यांचे हात आणि चारित्र्य स्वच्छ आहे, त्यांच्याबरोबर मी काम करतो. खोत यांच्याकडे हे दोन्ही नाही.
स्वत:चे अस्तित्व दाखविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. ज्या ठिकाणी आहेत, तेथून आणखी काही तरी पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांचा इतकाच कळवळा असेल, तर कडकनाथ योजनेमधील पैसे परत करा, शेतकऱ्यांबद्दल पुतनामावशीचे प्रेम दाखवू नका, अशी प्रतिक्रिया शेट्टी यांनी दिली.शेट्टी यांच्या टीकेनंतर खोत यांनीही पलटवार केला. ते म्हणाले की, ज्यांनी शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या, त्यांच्या अंगणात आमदारकीसाठी लोटांगण घालत गेलेत. राजू शेट्टी यांचे हात स्वच्छ आहेत, हे मला माहीत आहे. हेच हात आमच्या हातात होते, तेव्हा शेट्टी रोज काशीला जाऊन आंघोळ करून येत होते का? आता काय रोज गोमूत्राने आंघोळ करतात काय?
सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याला आपण फारसे महत्त्व देत नाही. स्वत:चे अस्तित्व दाखविण्यासाठी ते काहीही बरळत असतात. अशा फालतू माणसाच्या टीकेला उत्तर देण्याची गरज नाही.- राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना