मुंबई: राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी(Raju Shetti) आणि राष्ट्रवादीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. काही तांत्रिक त्रुटीमुळे राजू शेट्टींची आमदारकी इतर कुणालातरी जाण्याची शक्यता आहे. याविरोधात राजू शेट्टींनी आंदोलनाचा इशारा दिलाय. त्यावर आता माजी मंत्री सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) यांनी टीका केली आहे.
माध्यमांशी बोलताना सदाभाऊ म्हणाले की, 'राजू शेट्टींच्या आमदारकीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलाय. पण, मला वाटतं की त्यांचा भ्रमनिराश तेव्हा झाला होता, जेव्हा मला मंत्रीपद मिळालं होतं. आता त्यांचा पुन्हा भ्रमनिराश झालेला दिसतोय. त्यांनी आता काशीपर्यंत आत्मक्लेष यात्रा काढावी, अशा बोचरी टीका सदाभाऊ यांनी केली'. तसेच, 'राजू शेट्टींचं आंदोलन म्हणजे राजकीय दुकान चालवण्यासाठी आहे. या सरकारकडून भ्रमनिरास झाला असेल तर राजू शेट्टींनी बाहेर पडावं', असं आव्हान सदाभाऊ यांनी दिलं आहे.
काय म्हणाले होते राजू शेट्टी ?विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीतून राष्ट्रवादी काँग्रेसनं राजू शेट्टींचं नाव वगळल्याची चर्चा आहे. त्यावरून राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. 'आमदारकी द्यावी की देऊ नये हा मुद्दा माझ्यासाठी गौण आहे. राजकारणात असे समझोते होत असतात. 2019 च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी पक्षात झालेला समझोता पाळायचा की नाही पाळायचा, की पाठीत खंजीर खुपसायचा आणि कशा पद्धतीने पाळायचा हे ज्यांनी शब्द दिला त्याने ठरवायचं आहे. पण, मी योग्यवेळी करेक्ट कार्यक्रम करेन, असा इशारा राजू शेट्टींनी दिला होता.