लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सरकारच्या धोरणामुळे शेतीमालाला दर नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाल्याने कर्जमुक्तीची मागणी आम्ही करीत आहोत. आम्ही भीक मागत नसून घामाचे दाम मागतो. शेतकरी हिताच्या जो कोणी आडवं येईल, त्याला तुडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्वाणीचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेकूगिरी बंद करून शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार करावा, असेही त्यांनी सांगितले. ‘स्वाभिमानी’च्या ‘आत्मक्लेश’ यात्रा सहाव्या दिवशी, शनिवारी पनवेल येथे पोहोचली. त्यावेळी त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर कडाडून हल्ला चढविला. नरेंद्र मोदी यांनी १३ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केले; पण त्यांना शेतीतील काहीच कळत नाही. शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देण्याच्या घोषणेचे पालन केले असते, तर शेतकरी कर्जबाजारी झाला नसता. प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांना लुटण्याचे काम सरकारने सुरू केले असून, मोदींनी आता फेकूगिरी बंद करावी. आमच्यावर कोणी दडपण आणण्याचा प्रयत्न करू नये. शेतकऱ्यांचा अंत पाहू नका. अन्यथा, जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला. प्रकाश पोपळे, हंसराज वडगुले, राजेंद्र गड्याण्णावर, माणिक कदम, देवेंद्र भुयार, विकास देशमुख, रसिका ढगे, राजेंद्र ढवाण, सुरेश गवळी, प्रल्हाद इंगोले, दामू इंगोले, सचिन नलवडे, आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप खासदार-आमदारांवर टीकाभाजपने शेतकऱ्यांसाठी, ‘संवाद यात्रा’ सुरू केली असताना, भाजपचे खासदार आणि आमदार शेतकऱ्यांकडून चक्क पाय धुऊन घेतात असे सांगत, अशा नेत्यांवर राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली. शेतकऱ्यांकडून पाय धुऊन घ्यायची भाजप आमदार-खासदारांची लायकी नसल्याचे टीकास्त्र शेट्टी यांनी सोडले.पाय सुजले, रक्तदाबही कमीपुण्यावरून सुरू केलेली, ‘आत्मक्लेश यात्रा’ १४० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून, शनिवारी पनवेलमध्ये दाखल झाली. यावेळी सलग सहा दिवस पायी चालल्याने खासदार राजू शेट्टी यांची प्रकृती खालावली आहे, त्यांचे पाय सुजले आहेत, तसेच त्यांचा रक्तदाबही कमी झाला आहे.सरपटत जाईन, पण राजभवन गाठणारच!राजू शेट्टी यांचा रक्तदाब वाढला आहे. त्याचबरोबर त्यांच्या पायाला जखमा झाल्याने त्यांना नीट चालताही येत नाही. सरपटत जाईन, पण मंगळवारी राजभवन गाठणारच, असा निर्धार शेट्टी यांनी यावेळी केला.
शेतकरी हिताच्या आडवं आल्यास तुडवू : राजू शेट्टी
By admin | Published: May 28, 2017 1:15 AM