कोल्हापूर : आंदोलन केले तरच उसाला दर मिळतो, ही काहींनी खुळी समजूत करून ठेवली आहे. ‘एफआरपी’चा कायदाच असल्याने येथून पुढे आंदोलन करायची वेळच येणार नाही. आंदोलनावरून कुणी ब्लॅकमेलिंग करू नये. कायद्याप्रमाणे सर्वांना एफआरपी द्यावीच लागणार आहे. कोण जर थकवत असेल, तर त्यांना थकविण्याचे काम येथून पुढे केले जाईल, असे सांगतानाच राजू शेट्टी यांना वायफळ आत्मविश्वास नडल्याची टीका नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने यांनी केली.
हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी यांना पराभूत करून पहिल्यांदाच खासदार झालेले धैर्यशील माने यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शीसंवाद साधला. ते म्हणाले, देशपातळीवरील नेतृत्वाचे वेध लागलेल्या शेट्टींना मतदारसंघातील प्रश्न मात्र दिसले नाहीत. केवळउसाचे आंदोलन केले की मतदारसंघाचा विकास होत नसतो. त्यासाठी अष्टपैलू नेतृत्व हवे.
स्थानिक वास्तवापासून ते लांबच राहिले. हाताला रोजगार देण्याची गरज असताना त्यांनी आंदोलने करायला लावली. मोदींनी माझ्याविरोधात रिंगणात उतरवून दाखवावे, असे आव्हान ते देत राहिले. त्यांना हाच वायफळ आत्मविश्वास नडला.उद्धव ठाकरे रत्नपारखीमाने म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरे हे शब्द पाळणारे एकमेव नेते आहेत. माझ्यातील ‘स्पार्क’ ओळखण्याचे काम त्यांनी केले. ते खऱ्याअर्थाने रत्नपारखी आहेत.याउलट ज्या पवारांच्या पक्षात माने गटाने २० वर्षे घालवली, त्या पवारांना माझ्यातील स्पार्क दिसला नाही, याचे वाईट वाटते. मी घराणेशाही म्हणून उमेदवारी मागत नव्हतो. माझ्यात ती क्षमता होती; पण पवारांना ते दिसले नाही. त्यांना आपल्या नातवामध्ये असा कुठला स्पार्क दिसला, हे माहीत नाही.