नागपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्यावरून स्टेट बँक आॅफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांच्यावर चहूबाजूंनी टीका करण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी भट्टाचार्य यांच्या वक्तव्याचा निषेध करीत नागपुरात त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. भट्टाचार्य यांनी शेतकऱ्यांचा अपमान केल्याची भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली.शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नये, असे वक्तव्य भट्टाचार्य यांनी केले होते. याच्या निषेधार्थ राजू शेट्टी हे कार्यकर्त्यांसह सकाळी ९च्या सुमारास स्टेट बँकेच्या रेल्वे स्थानकाजवळील मुख्य शाखेसमोर पोहोचले. सुरुवातीला भट्टाचार्य यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या वेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तूपकर उपस्थित होते.आम्ही सरकारमध्ये असलो तरी बाहेरून आंदोलने करून शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती घेतल्याशिवाय राहणार नाही, असे शेट्टी यांनी सांगितले. अनेक बँकांनी कॉर्पोरेट कंपन्यांसोबत डील केले आहे. उद्योजकांच्या कर्जाला माफी मिळते मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आला की त्यांचा अपमान करण्यात येतो. हे चालणार नाही. शेतकरी गप्प राहणार नाही. आम्ही कर्जमाफी मिळवूनच राहू व यासाठी पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा शेट्टी यांनी दिला. (प्रतिनिधी)
राजू शेट्टी यांचा नागपुरात हल्लाबोल
By admin | Published: March 21, 2017 3:27 AM