ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांची आत्मक्लेश यात्रा मुंबईत दाखल झाली आहे. ही यात्रा चेंबूरहून दक्षिण मुंबईतील आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाली आहे. या यात्रेमुळे मात्र सर्वसामान्य मुंबईकरांना क्लेश होत आहे कारण पनवेल-सायन मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहतूक कोंडीमुळे मानखुर्दपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
आत्मक्लेश यात्रेमागील नेमकं कारण काय ?
‘अच्छे दिन’ येतील म्हणून भुलून आम्ही भाजपवाल्यांच्या मागे गेलो; परंतु प्रत्यक्षात आमच्या वाट्याला कडकडीत ऊनच आले. सरकार जर आमच्या प्रश्नांना न्याय देणार नसेल तर ते उलथवून टाकण्याची ताकद चळवळीत आहे, असा सज्जड इशारा देत भाजपचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी आत्मक्लेश यात्रा काढण्याचा निर्णय घेतला.
राज्य सरकारने शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा व प्रतिटनास ५०० रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा; अन्यथा पुण्यातून हजारो शेतकरी चालत मुंबईला राजभवनवर धडक देऊन आत्मक्लेश आंदोलन करतील, असे शेट्टी यांनी जाहीर केले होते. त्यानुसार 22 मेपासून या यात्रेला सुरुवात झाली.