पुणे : कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन हे शेतकऱ्यांचे नव्हे तर बाजार समित्यातील अडत्यांचे आहे. असा आरोप काही जण करत आहेत. पण हे आरोप जे करत आहेत त्या संघटना ह्या सरकारधार्जिण्या आहेत. बाजार समित्यांमध्ये सर्व काही आलबेल आहे असे आमचे म्हणणे नाही.पण बाजार समितीच्या प्रचलित पध्दतीत पैसे कमी मिळत असले तरी शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची हमी आहे. यामुळे बाजार समितीतील कायदे कडक करून ते अधिक सक्षम केले पाहिजेत असे सांगतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘घरात ढेकणं झाली म्हणून घर जाळायचं नसत’असे उदाहरण देत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
पुण्यात राजू शेट्टी यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकरी आंदोलनावर भाष्य केले.
शेट्टी म्हणाले, बाजार समितीसह खुल्या बाजाराला परवानगी देणे म्हणजे, बाजार समित्या दुबळ्या करणे व कालांतराने त्या बंद करणे हा या कायद्यांमागील उद्देश असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
चंद्रकांत पाटील हे लोकशाहीची उदाहरणे देत असतील तर त्यांनी, प्रथम कृषी कायदे मंजूर करताना हरकती व सूचना का मागविल्या नाहीत याचे स्पष्टीकरण द्यावे असे शेट्टी यांनी सांगितले. कांदा निर्यातीवरून बोलताना त्यांनी, पिका-पिकात दुजाभाव करण्याचा सरकारला काही कारण नसून, जसे ऊस पिकाला हमी भाव मिळतो तसा इतर पिकांनाही हमीभाव निश्चित केला पाहिजे असे मत देखील शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केले.
---------------------------------------