मुंबई : कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या आणि पुन्हा परतणाऱ्या नाशिककरांची गैरसोय टाळण्यासाठी एलटीटी-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस सीएसटीपर्यंत चालविण्यात आली. मात्र, ही ट्रेन सीएसटीपर्यंत सुरू करतानाच, ठाणे स्थानकातील थांबा काढण्यात आला होता. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने, ठाणे स्थानकात थांबा देण्याची मागणी केली जात होती. या मागणीनुसार, १७ फेब्रुवारीपासून ठाणे स्थानकात राज्यराणीला थांबा देण्याचा निर्णय घेतल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. मुंबईत येणाऱ्या नाशिककरांसाठी मनमाड-राज्यराणी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. मात्र, एलटीटीपर्यंत धावत असलेल्या या ट्रेनमुळे प्रवाशांना सीएसटीपर्यंत येण्यासाठी कुर्ला स्थानकातून लोकल पकडावी लागत होती. गैरसोय होत असल्याने, राज्यराणी एक्स्प्रेस सीएसटीपर्यंत चालविण्याची मागणी नाशिककरांकडून होऊ लागली आणि त्याची दखल घेत, १२ आॅक्टोबर २0१५ पासून त्याची अंमलबजावणी मध्य रेल्वेकडून करण्यात आली. मात्र, सीएसटीपर्यंत एक्स्प्रेस चालविताना या पूर्वी असलेला ठाणे स्थानकातील थांबा काढून टाकण्यात आला आणि सीएसटीपासून ते कल्याणपर्यंत एक्स्प्रेस चालविण्यात आली. राज्यराणी एक्स्प्रेस पकडणाऱ्यांना कल्याणपर्यंत जावे लागत असल्याने, पुन्हा ठाणे स्थानकात थांबा देण्याची मागणी होऊ लागली आणि ही मागणी लक्षात घेऊन, त्याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. अखेर त्याला मंजुरी मिळाल्यानंतर, १७ फेब्रुवारीपासून ठाणे स्थानकात राज्यराणीला एक मिनिटासाठी थांबा देण्यात येत असल्याचे, मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. हा थांबा ३१ मार्चपर्यंत देण्यात येईल. (प्रतिनिधी)
राज्यराणीला ठाण्यात थांबा
By admin | Published: February 17, 2016 3:01 AM